श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी भव्य महिला कृषी मेळाव्याचे आयोजन
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त रविवार, दि. २२ रोजी दुपारी १२ वाजता मंगळग्रह मंदिराच्या प्रसादालयात महिला कृषी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक संभाजी ठाकूर असतील .कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी भरत वंजारी यावेळी उपस्थित राहतील.
बीजमाता पोपरे करणार मार्गदर्शन
अहमदनगर जिल्ह्यातील बिजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील ४०० एकर जमिनीवर राहीबाईंच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जात असून त्यांनी जपलेली बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि विदेशात उपयोगी पडत आहेत. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातीचे बियाणे त्यांनी तयार केले आहे. कृषी क्षेत्रातील केलेल्या कामाची दाखल घेत त्यांना राज्य शासनासह विविध संस्थांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.