रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (16:19 IST)

मनोज जरांगेंकडून आमरण उपोषण मागे, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार

manoj jarange patil
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
अंतरवाली सराटी इथे बोलताना त्यांनी म्हटलं की, "महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे मी माझं आमरण उपोषण स्थगित करतोय. मी आता अंतरवालीतच साखळी उपोषण करणार आहे. एक दोन दिवस उपचार घेऊन मी आता मराठा समाजाच्या भेटीला गावागावात येणार आहे. आता तुम्ही आणि आपण एकविचाराने पुढची दिशा ठरवणार आहोत.
 
लोकशाहीत प्रत्येकाला संवाद साधण्याचा अधिकार आहे. तुम्हीही महाराष्ट्रभर साखळी उपोषणे आणि धरणे आंदोलनं सुरु ठेवू शकतात. लोकांना संचारबंदीमुळे अंतरवाली मध्ये येता येत नाहीये. मी सुखरूप आहे. लोकांमध्ये काही अफवा पसरत आहेत. डॉक्टरांशी बोलून कुठे उपचार घ्यायचं हे ठरवतो."
 
उपोषण सोडत असल्याची घोषणा करताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
 
त्यांनी म्हटलं की,"देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी मी पार पाडली. त्यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे. पोलीस आणि मराठ्यांचा संघर्ष झाला असता तर काय झालं असतं? देवेंद्र फडणवीसांचं काम मी केलं आहे.
 
रात्री काही झालं असतं तर राज्य पेटून उठलं असतं. पहिला हल्लाही त्यांनीच केला आहे. तेच म्हणाले की माझ्या पोलिसांना मारलं आहे. त्यांनी केसेस मागे घेतलेल्या नाहीत. त्यांनी पोलीस बाजूला करावेत आणि 'सागर'चा दरवाजा उघडावा आणि मी जायला तयार आहे. तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही."
 
आज (26 फेब्रुवारी 2024) सकाळपासून अंतरवाली सराटी आणि परिसरात मराठा आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळाली. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
तर जालना जिल्ह्यात बस पेटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर जालना, संभाजीनगर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे.
 
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरागे पाटील यांनी काल अंतरवाली सराटीत बैठकीदरम्यान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
 
फडणवीस माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, मला सलाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केल्या जातोय असं म्हणत जरांगे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केले होते.
 
'फडणवीस यांना माझा बळीच हवाय ना तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या,' असं म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
 
दरम्यान, जरांगे हे अंतरवाली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आज सकाळीच जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
 
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हे तिन्हीही सहकारी सक्रिय आहेत. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. यामुळेच आज 26 फेब्रुवारी सकाळी ज्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
 
अज्ञातांनी एसटी पेटवली
जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे अज्ञाताने एसटी महामंडळाची बस पेटवल्याची माहिती समोर आली आहे.
 
तीर्थपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाची अंबड आगाराची अंबड वरून आलेली अंबड- रामसगाव बस क्रमांक MH 14, BT 1822 आज सकाळी पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
 
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व बस बंद करण्यात आलेल्या आहे. पुढील आदेशापर्यंत जालना जिल्ह्यातील बस बंद राहतील अशी माहिती विभागीय नियंत्रक प्रमुख नेहुल यांनी दिली.
 
छगन भुजबळांची जरांगेवर टीका
राज्य सरकारातील अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेवर टीका केली असून त्यांचा बोलविता धनी वेगळा असल्याचं म्हटलं आहे.
 
"जरांगे पाटील यांच्यामागे कोणीतरी आहे हे मी आधीपासूनच सांगतोय. ज्यापद्धतीने पोलिसांवर लाठीचार्ज झाला बाकी गोष्टी झाल्या मी तेव्हाच सांगितलं होतं.
 
"पवारांना माहिती असतं की तिकडे काय झालंय तर ते गेले नसते. त्यांना रोहित पवार आणि टोपेंनी बोलवलं होतं. काही झालं तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही," असं त्यांनी पुन्हा सांगितलं.
 
राज्य सरकारातील मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की जरांगे पाटील हे सातत्याने भूमिका बदलत आहेत.
 
"जरांगे पाटील यांची भूमिका वारंवार बदलत गेली. सरकारने जे शक्य आहे ते सर्व केले. काल त्यांनी कहर केला, फडणवीसांवर आरोप केले. त्यांना एकेरी भाषा वापरली. जरांगे- पाटील यांना उपचार घेण्याची आणि आराम करण्याची गरज आहे," असं शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.
 
फडणवीसांचा बंदुकीचा फोटो, जरांगे म्हणतात 'तर मीही तलवारीचा फोटो टाकतो'
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी (सोमवारी) पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हे आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचे मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील भांबेरी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.
 
काल (25 फेब्रुवारीला) देवेंद्र फडणवीस यांनी महाएक्सपो या ठिकाणी भेट दिली होती. तिथे त्यांनी बंदुकीचा फोटो काढला आणि तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला.
 
हा फोटो मुद्दामहूनच टाकल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जर तुम्ही बंदुकीचा फोटो टाकणार असाल तर मी देखील तलवारीचा फोटो काढून टाकू शकतो असं जरांगे म्हणाले.
 
हे आंदोलन चिरडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे कुटील डाव खेळत आहे पण आम्ही हे आंदोलन चिरडू देणार नाहीत, कोणत्याही परिस्थितीत सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करुन घेऊच असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
 
मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे की आपण सर्वांनी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करायचे आहे. असं म्हटल्यानंतर पुढे ते म्हणाले, पुढील एक दोन तासांत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. असे बोलून ते आपल्या गावी म्हणजेच अंतरवाली सराटीला गेले आहेत.
 
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
देवेंद्र फडणवीस : 'शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या स्क्रिप्टवर बोलत होते, त्याच लाइनवर मनोज जरांगे चाललेत'
याआधी, 25 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मांडले.
 
“सागर बंगला हा सरकारी आहे. कुणीही सरकारी कामासाठी तिथं येऊ शकतं त्यासाठी काहीही अडवणूक होणार नाही,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
 
सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (25 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
 
या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल तसंच 'सागर' बंगल्यावर येण्याच्या आव्हानाबद्दल प्रश्न विचारले गेले.
 
या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं, “मी मराठा समाजासाठी काय केलं असं विचारलं तर मी सांगेन की सारथीसाठी मी निधी मंजूर करुन घेतला. मी हायकोर्टात आरक्षण टिकवलं. ते सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही.”
 
फडणवीस यांनी म्हटलं, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्या स्क्रिप्टवर बोलत होते त्याच लाइनवर सध्या मनोज जरांगे पाटील बोलत आहेत. ते असं का बोलत आहेत? जर कुणी कायदा हातात घेत असेल तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे आवश्यक पाऊल असेल ते आम्ही घेऊ.”
 
मनोज जरांगेंनी आरोप केला होता की, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला होता.
 
“पत्रकारांनी या आरोपाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशा आरोपांवर काय बोलावे? या गोष्टीवर तुमचा तरी विश्वास बसतो का? असे बिनबुडाचे आरोप योग्य नाहीत.”
 
‘प्रत्येकाने आपल्या मर्यादेत काम करावं’- एकनाथ शिंदे
 
 
मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि त्यांच्या आंदोलनाच्या दिशेबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, “मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत अशी आमची एक भावना होती. त्यांनी ज्या ज्या वेळी ज्या मागण्या केल्या तेव्हा आम्ही त्या मान्य केल्या.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 56 मोर्चे करण्यात आले होते. ते सर्व आंदोलन शांततेत झाले होते. पण आता काही ठिकाणी अशांतता निर्माण केली जात आहे. मी मुख्यमंत्री म्हणून कधीही मोठेपणा ठेवला नाही.”
 
मनोज जरांगेंची भाषा ही राजकीय भाषा वाटत आहे. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने निर्णय घ्यावा. विचार करावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात त्यांनी गलिच्छ भाषा वापरली, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
त्यांनी पुढे म्हटलं की, “देवेंद्र फडणवीस हे जर मराठा विरोधी असते तर त्यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात कसं टिकलं असतं. ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ते कुणामुळे टिकलं नाही याचा विचार करा.
 
कायदा सर्वांसाठी समान आहे. आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत काम करावं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही.”
 
मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर काय आरोप केले होते?
“मी ब्राह्मणांवर टीका केली नाही, माझे माझ्या गावातील ब्राह्मणांशी चांगले संबंध आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे नेहमी पडद्याआडून सूत्रं हलवतात,” असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
 
भांबेरीमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
“मला मुंबईला जाण्यापासून आता अडवू नका,” असं जरांगे यांनी आपल्या समर्थकांना म्हटलं.
 
"मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव होता. हे सगळं फडणवीसांचं षडयंत्र आहे," असा गंभीर आरोप मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (25 फेब्रुवारी) केला.
 
जालन्यातील अंतरवाली सराटीमधील उपोषणस्थळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
उपोषण करून मरण्यापेक्षा 'सागर' बंगल्यावर येतो, तिथेच प्राण सोडतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
 
त्यानंतर जरांगे आंदोलन स्थळावरून उठून गाडीत बसले आणि जरांगे मुंबईला जाण्यासाठी निघाले आहेत. कार्यकर्ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण जरांगे मुंबईला देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर जाण्याबद्दल ठाम होते.
 
"देवेंद्र फडणवीस, तू मनोज जरांगेच्या मागे लागला आहेस, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुला पुरून उरेन," असंही जरांगेंनी म्हटलंय.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी फडणवीसांवर तोफ डागली. ते म्हणाले, "पत्रकारांवर इतका दबाव आहे. त्याला सगळी ताकद दिली. हे सगळे फडणवीसचं काम आहे. त्यात मुंबईचे चार-पाच समन्वयक आहे. ते सुद्धा शिंदे साहेबांच्या आसपास फिरतात. मला बदनाम करण्यासाठी टोळी उभी केली आहे. ते पत्रकार परिषद घेतील आता बघा. त्याला (फडणवीस) इथे यायचं होतं. पण मी येऊ दिलं नाही."
 
"अमित शाह संभाजीनगरला येणार होता. तो आला नाही. 19 तारखेला मोदी येणार होता. ते आले नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस चिडला. त्याच्या पुढे गेलेलं त्याला खपत नाही. म्हणून मला बदनाम करायचं हे षड्यंत्र आहे. जो माणूस स्वत:चा पक्ष सोडत नाही ते याच्यामुळे सोडावं लागलं. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे हे मला सांगायचंय," असंही जरांगे म्हणाले.
 
बामणी कावा माझ्याविरोधात चालू देणार नाही, असं म्हणत जरांगे म्हणाले, "सागर बंगल्यावर येणार उपोषण करणार. तेव्हा बघ.”
 
जरांगे म्हणाले, "मी समाजाचा नेता म्हणून काहीही करत नाही. सामान्य घरातून आलेला, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करत आहे. मला कशाचीही हाव नाही, पण समाजावर प्रेम आहे. त्यासाठीच हे घडलंय. मी स्वार्थी असतो तर आधीच उघडा पडलो असतो. कशाच्या तरी निमित्ताने माणूस उघडा पडतोच. पण मी समाजावरची निष्ठा ढळू दिलेली नाही. माझा देव समाज आहे आणि समाजावर निष्ठा असल्यानं मी समाजाला मायबाप म्हटलं आहे."
 
"सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आपण ओबीसीतून मराठ्यांना सरसकट मागत आहोत. जे सिद्ध झालं आहे तेच. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध झालंय. पण तुम्हाला सरसकट द्यायचं नसेल तर ज्यांचे पुरावे आढळले, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा पर्याय काढला होता. सरकारच्या मदतीनं हा पर्याय काढला होता," असं जरांगे म्हणाले.
 
"सरकारनं फडणवीसांच्या सांगण्यावर प्रमाणपत्रं देणं बंद केलं. खुमखुमी असेल तर मैदानात या, असे आडाखे वापरू नका," असंही जरांगे म्हणाले.
 
"पुरावे असतील तर द्या. नुसते आरोप करून काय अर्थ आहे," अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
 
तुम्ही आरोप केले म्हणजे खरे असं जनता मानत नाही. जनतेला माहीत आहे की मुख्यमंत्री असतानाही त्यांनी आरक्षण दिलं होतं. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षण दिलं आहे. मराठा तरुणांनी या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये संधी मिळवाव्यात, असंही भातखळकर यांनी म्हटलं.
 
मराठा आरक्षण विधेयक मंजूर
20 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक मांडलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं.
 
त्यानुसार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र असं शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं आहे.
 
मात्र, मनोज जरांगे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवून आपण सगेसोयरे तरतुदीवर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची ताकद सर्वांना दिसेल, असं म्हटलं आहे.
 
त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, मनोज जरांगे सरकारने दिलेला प्रस्ताव स्वीकारायला का तयार नाहीत?
 
बीबीसी मराठीसाठी स्नेहल माने यांनी यावर सविस्तर विश्लेषण केलं होतं, ते इथे पुन्हा देत आहोत :
 
सगेसोयरे शब्दावर जरांगेंचा भर कारण...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळविला होता. यावेळी आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून ते आमरण उपोषण करणार होते.
 
अंतरवाली सराटीतून निघताना त्यांनी सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. म्हणजे काका, मामा, आत्या, मावशी आदी सग्यासोयऱ्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याचं शपथपत्र असेल तर हा पुरावा मानून अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती.
 
मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत येताच सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार आपल्या अधिसूचनेत सगेसोयरे या शब्दाचा समावेश केला.
 
सरकारने आपल्या अधिसूचनेत सग्यासोयऱ्यांमध्ये अर्जदाराच्या वडिलांचे, आजोबांचे, पणजोबांचे नातेवाईक तसेच आधीच्या पिढ्यांनी त्याच जातीत लग्न केल्यानंतर निर्माण झालेल्या नातेवाईकांचा समावेश केला होता. म्हणजेच अर्जदाराच्या 'पितृसत्ताक पिढ्यांनी' म्हणजेच अर्जदारांच्या वडिलांच्या बाजूच्या वाडवडिलांनी, त्याच जातीत लग्न केल्यावर निर्माण झालेले वेगवेगळे नातेवाईक म्हणजे सगेसोयरे होय.
 
त्यानंतर सरकारने मराठा आरक्षण विधेयक मांडलं, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आणि ते दोन्ही सभागृहात मंजूरही करून घेतलं. पण त्यातील सगेसोयरे हा मुद्दा वगळण्यात आला.
 
अधिसूचना आणि अध्यादेश यांमध्ये फरक असतो. एखादा कायदा करायचा असेल तर त्यास दोन्ही सभागृहांची मंजूरी आवश्यक असते. यासाठी अध्यादेश काढला जातो आणि दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळेपर्यंत अध्यादेश हा कायदा म्हणून अमलात आणला जातो. पण हा अध्यादेश काढण्यासाठी अधिसूचना काढावी लागते.
 
गरजेचं नाही की अधिसूचना ही अध्यादेशात बदललीच जावी. त्यामुळे अधिसूचना काढूनही सरकारने सगेसोयरे हा मुद्दा वगळला.
 
आता जरांगेंची मागणी अशी आहे की, 'रक्ताच्या नात्याला कुणबी नोंदणीची परवानगी द्यावी. जेणेकरून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेल.'
 
कुणबी म्हणजे कोण?
कुणबी ही महाराष्ट्रातील अशी एक जात आहे जी ओबीसी प्रवर्गात मोडते. मराठा समाजातील सर्व सदस्यांना कुणबी समजावे आणि त्यानुसार ओबीसी कोट्यात आरक्षण द्यावे, असा आग्रह जरांगे पाटलांनी धरलाय.
 
पण मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. आतापर्यंत मुलाची जात ही वडिलांच्या जातीवरूनच ठरवली जायची. म्हणजेच आईच्या जातीचा विचार न करता मुलाला वडिलांची जात लावली जायची.
 
महाराष्ट्राच्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता होती, त्या भागातील मराठा समाजाला त्यांच्या पूर्वजांचे कुणबी प्रमाणपत्र शोधण्यात अडचणी येत नव्हत्या. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक मराठा जातीतील कुटुंबियांनी कुणबी असल्याचे दाखले घेतले आहेत. मराठवाड्याच्या बाबतीत मात्र चित्र वेगळे आहे.
 
मराठवाड्यावर हैदराबादच्या निजामाचे राज्य होते. ज्यामुळे या भागातील मराठ्यांना त्यांच्या पूर्वजांचे कुणबी प्रमाणपत्र शोधणे कठीण जात होते. म्हणूनच मराठवाड्यात कुणबी असल्याच्या नोंदी सापडण्याचे प्रमाण कमी आहे.
 
कुणबी प्रमाणपत्र असलेल्या महिलेने एखाद्या मराठा कुटुंबात लग्न केलेले असले तरी त्या महिलेच्या मुलाकडे कुणबी असल्याचे प्रमाणपत्र नव्हते. याच कारणामुळे मनोज जरांगे यांनी ज्या व्यक्तीच्या सगेसोयऱ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्या व्यक्तीला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे.
 
त्यांचं म्हणणं आहे की, "सरकारने दिलेल्या आरक्षणाचा फायदा केवळ 100-150 मराठ्यांना होणार आहे. बाकीचा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे 'सगे सोयरे'ची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी माझी मागणी आहे."
 
पण मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करून घेणं कायदेशीररित्या शक्य आहे का?
या प्रश्नांची उत्तर शोधण्याआधी महाराष्ट्रातील आरक्षणाची परिस्थिती काय आहे, हे पाहूया.
 
SC- 13%
 
ST- 7%
 
OBC- 19%
 
SBC- 2%
 
NT (A)- 3% (विमुक्त जाती)
 
NT (B)- 2.5% (बंजारा)
 
NT (C)- 3.5% (धनगर)
 
NT(D)- 2% (वंजारी)
 
याचा अर्थ SC, ST, OBC, SBC आणि NT ही आरक्षणं असताना ती 50 टक्क्यांच्या आत बसत होती.
 
त्यामध्ये आता 10 टक्के मराठा आरक्षणाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील आरक्षण 62 टक्क्यांवर पोहोचले आहे. यामध्ये केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या 10 टक्के आरक्षणाचा समावेश केल्यास आरक्षणाची टक्केवारी 72 टक्क्यांवर पोहोचते.
 
मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये करण्याची शिफारस याआधी कधी?
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना आरक्षण दिलं.
 
कुठल्याही जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यासाठी मंडल आयोगानं काही निकष आखून दिले आहेत.
 
महाराष्ट्रात 1995 साली स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. त्यांनी 2000 साली अहवाल सादर केला.
 
ज्या पोटजातींची नोंद मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशी आहेत, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकता येते. आयोगाच्या या शिफारशीमुळे मराठ्यांमधील काहींना ओबीसीत प्रवेश मिळाला. मात्र ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाही, त्यांची ओबीसीत वर्गवारी झाली नाही.
 
नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न न्या. आर. एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे आला. न्या. बापट आयोगानं राज्यभरात सर्वेक्षण करून 2008 साली अहवाल सादर केला. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात समाविष्ट करण्यास या आयोगानं नकार दिला.
 
न्या. बापट आयोगानंतर महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आणि आंदोलनं सुरू झाली. त्यामुळे आघाडी सरकारनं 21 मार्च 2013 साली माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली.
 
या समितीला हे सिद्ध करायचं होतं की, राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे. कारण मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध केल्याशिवाय मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे मिळणार नव्हते.
 
या राणे समितीनं राज्यात फिरून, तज्ज्ञांशी बोलून ताबडतोब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला होता.
 
मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे, त्या प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस राणे समितीच्या अहवालात करण्यात आली.
 
मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करणं शक्य आहे का?
सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅड. दिलीप तौर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना यापूर्वी सांगितलं होतं की, "महाराष्ट्रात ओबीसींना 19 टक्के आरक्षण आहे. त्यांच्या लोकसंख्येशी तुलना करता हे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या 31 टक्के आहे. दोन्ही समाजांच्या लोकसंख्येचा विचार करता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल."
 
हे कसं शक्य होईल, याबद्दल अधिक विस्तारानं सांगताना दिलीप तौर यांनी म्हटलं होतं की, ओबीसी समाजाला जे 19 टक्के आरक्षण आहे, ते तसंच ठेवायचं. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करून त्यांना 13 टक्के आरक्षण द्यायचं. म्हणजे ओबीसी प्रवर्गाचं एकूण आरक्षण हे 32 टक्के होईल.
 
पण यामुळेही सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन होत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना दिलीप तौर यांनी म्हटलं, "आज देशातल्या 28 राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण आहे. तामिळनाडूचंच उदाहरण घ्या. या राज्यात 69 टक्के आरक्षण आहे. याबद्दलचं प्रिन्सिपल असं आहे, की एखाद्या राज्यात मागास समाजाची संख्याच 70 टक्के किंवा अधिक असेल तर 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण वैध ठरू शकतं. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करणं व्यवहार्य ठरू शकतं."
 
सरकारची अधिसूचना आणि नंंतर सावध पाऊल
मराठा आंंदोलनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल अशी घटना 27 जानेवारी घडली होती. मनोज जरांंगे पाटील हे हजारोंंच्या संख्येनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे आझाद मैदानावर आंंदोलन करण्यासाठी निघाले होते. जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक वाशीजवळ असतानाच सरकारने त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्याचं म्हटलं होतंं. सरकारने एक अध्यादेश काढून जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या आणि ते तिथून माघारी परतले पण त्यांनी सगेसोयरे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू केले.
 
दुसरीकडे, सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी संंघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी ओढवणे सरकारसाठी अत्यंत धोक्याचे होते.
 
मनोज जरांगे यांच्या आंंदोलनानंतर राज्य सरकारमधील मंंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्यभरात ओबीसी मोर्चे काढत मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळू देण्यास आक्षेप नोंदवला. ओबीसी समाजाच्या इतर संघटनांंनी देखील हा आक्षेप नोंदवल्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याचा मुद्दा हा अतिशय संंवेदनशील बनला.
 
त्यानंंतर एकनाथ शिंदे यांंनी 20 फेब्रुवारी रोजी कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागू देता विधिमंंडळात मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षणाचे विधेयक मांडले आणि मंंजूर करुन घेतले. हे 10 टक्के आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंंका व्यक्त केली आहे. आधीच्या आरक्षणात आणि आताच्या आरक्षणात फारसा फरक नसल्याचे मत राज्याचे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांंनी मांंडले आहे.
 
या पार्श्वभूमीवर मनोज जरांंगे पाटील हे स्वतंत्र आरक्षणाला विरोध करत आहे. जर याऐवजी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली तर मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे ठरेल आणि ओबीसीमधून आरक्षणाचा पर्याय खुला होईल असा विचार करुन त्यांनी आंदोलनावरच ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Published By -Priya Dixit