शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:43 IST)

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते आज मुंबईला धडक देणार, आझाद मैदानात ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते सोमवारी मुंबईला धडक देणार आहेत. राज्य शासनाने सुरू केलेल्या नोकर भरतीविरोधात मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तोपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्याची मागणी करत राज्य समन्वयकांनी विधानसभा अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनाची हाक दिली होती. दरम्यान, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी शहराची नाकाबंदी केली.
कोल्हापूर, नाशिकसह विविध जिल्ह्यांत आंदोलकांची धरपकड सुरू झाल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबईतील समन्वयकांनी सोमवारी आणि मंगळवारी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महामुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, नोकर भरतीला मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध आहे. या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शासनाकडे वेळ मागितली आहे.  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी चर्चा होणार आहे. तूर्तास तरी महामुंबईतील समन्वयक नोकर भरतीविरोधात आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करतील.
 
 सोमवारी अधिवेशनात उपस्थित राहणार्‍या आमदारांची भेट घेऊन आपल्या मागण्या पुढे रेटण्याचा निश्‍चय मराठा क्रांती मोर्चातील महामुंबईमधील समन्वयकांनी केला. मात्र अधिवेशनात यावेळी पास मिळणार नसल्याची माहिती मिळाल्याने आता मंगळवारी दक्षिण मुंबईत आमदारांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. आमदारांच्या या महत्त्वाच्या बैठकीत मोर्चाची पुढील रूपरेषा ठरणार आहे.