गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

रामचंद्राचीं आरती

Ramayan
राक्षसंभारे पृथ्वी बहुभारभूत ।
गोरूपें देवादिक मुनिजनास हित ॥
जाउनि ब्रह्मदेवा रोदनयुक्त ।
कथिला दु:खरूप सर्वहि वृत्तांत ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीरामा ।
हरिहरब्रह्मादिका न कळे गुणसीमा ॥ धृ. ॥
ऎकूनियां चतुराननें केलें ध्यानासी ।
सत्वर गेले सर्वही क्षिरसागरासी ॥
श्रृत्यादिक द्रुहिणस्तुति जाणोनी प्रेमासी ।
निजदासां दर्शन दे हरि तेजोराशी ॥जय देव. ॥ २ ॥
प्रार्थित दशास्यवध तो जाणुनि अवतार ॥
धरितो ऎशी वाणी झाली साचार ॥
निर्गुण परि सगुणत्वें झाला साकार ।
चारीरूपें प्रगटे राजा रघुवीर ॥ जय. ॥ ३ ॥
कौसलेचा राम कैकयी भरत ।
सुमित्रात्मज लक्ष्मण शत्रुघ्नसहित ॥
होता पृथ्वी झाली भयकंपरहित ।
सीतारुपे माया जनकागृहीं येत ॥जय देव. ॥ ४ ॥
कौमारीं व्रतबंधन ब्रह्मनंदनें ।
केलें झालें सर्वहि विद्यासंपन्न ॥
कौशिकमख रक्षोनी अहल्योद्धारण ।
त्र्यंबकधनु भंगोनी सीता करग्रहण ॥ जय. ॥ ५ ॥
भृगुनंदन मद हरूनी साकेती वास ।
द्वादश वर्षेकरितां सीतावीलांस ।
पितृवचनो पास्यें सुखकर वनवास ।
विराध वधुनि दिधला स्वर्ग निर्दोष ॥ जय. ॥ ६ ॥
मायामारिच वधितां सीतेचें हरण ।
होतां पक्षींद्रा प्रभू दे मोक्षदान ॥
कबंध वधुनी तैसे शबरीउद्धरण ।
करुनि सुग्रिवमैत्री वाळीनिर्दळण ॥ जय. ॥ ७ ॥
सीताशुद्धी करुनी हरिंद्र सहसैन्य ।
समुद्रतीरी जातां बिभिषण ये शरण ॥
पाहुनि लंकाधिश त्या केला सन्मान ।
श्रीरामेश्वर शंभू स्थापिला जाण ॥ जय. ॥ ८ ॥
सेतूबंधन करूनी लंका आक्रमण ।
सपुत्र परिवारेंसी वधिला रावण ॥
ऎसें करुनी श्रीशें भूभार हरण ।
बिभीषणाप्रति केलें लंकेचे दान ॥ जय. ॥ ९ ॥
पुष्प कयानीं सीतासह परिवारेंसी ।
बैसुनि करुणासिंधू भेटे भरतासी ॥
साकेतामधिं सुरवर मुनिजन देवर्षी ॥
राज्याभिषेक करिती प्रजा बहु हर्षी ॥ १० ॥
रविवंश ध्वषभूषण श्रीमद्दाशरथी ।
रति पतिदहना ह्रदयीं प्रेमे करि वसती ।
स्मरता दीन जनांप्रति दे चारी मुक्ती ॥
रंगनाथसुत प्रभुतें करितो आरती ॥ जय. ॥ ११ ॥