रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन

कुष्टरोग्यांसाठी आपलं अवघं आयुष्य देणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे (वय ९४) यांचे शु्क्रवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. बाबांनी जिथे कुष्टरोग्यांसाठी आनंदवन उभारून त्यांचं जीणं आनंददायी बनवलं, त्याच आनंदवनात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कर्करोगासह अनेक रोगांनी बाबांना घेरलं होत, पण ९४ व्या वर्षांपर्यंत त्यांच्याशी लढणाऱ्या या चिरतरूण माणसाला अखेर मृत्यूने पहाटेच्या वेळी गाठलंच.

बाबा अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते. वर्ध्यातील हिंघणघाट हे त्यांचे मूळ गाव. तेथील श्रीमंत कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे वकिली करायला सुरवात केली. पण त्यानंतर एका प्रसंगाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. वकिली करतानाही त्यांची समाजसेवा सुरूच होती. पण त्यानंतर एका कुष्टरोगी माणसाला बघितल्यानंतर बाबांमधील माणूस हेलावला आणि त्यांच्यासाठीच त्यांनी आपलं आयुष्य द्यायचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन उभारलं.

बाबांचं कार्य केवळ कुष्टरोग्यांपुरतेच मर्यादीत नाही. ८० च्या अस्वस्थ कालखंडात भारतातून फुटण्याच्या काही राज्यांत हालचाली सुरू झाल्या होत्या. दहशतवादी कारवायांनी देश पोखरला होता. अशा वेळी देश एकसंध राखण्यासाठी बाबांनी भारत जोडो आंदोलन केले. त्याद्वारे कन्याकुमारी ते काश्मीर आणि गुजरातपासून अरूणाचल प्रदेशापर्यंत जनजागृती केली.

त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, रॅमन मॅगेसेसे अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ज्वाला आणि फुले नावाच त्यांचा कवितासंग्रहही खूप गाजला. त्यांच्या मागे पत्नी, मुले प्रकाश व विकास, सूना नातवंडे असा परिवार आहे.