बाबांचं आनंदवन
बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन उभारलं. पण हे आनंदवन आहे तरी काय?
१९५१ च्या जूनमध्ये बाबांनी आनंदवनात रहायला सुरवात केली, त्यावेळी त्यांच्याबरोबर एक गाय, कुत्रा, चौदा रूपये यांच्यासह पत्नी साधना व दोन मुले विकास व प्रकाश होती. शिवाय बाबांचे कुष्ठरोगी होतेच. बाबा अतिशय सकारात्मक होते. त्याचबरोबर विजिगीषू वृत्ती त्यांच्यात ठासून भरली होती. म्हणून बाबांनी आपल्या या प्रकल्पाला कोणतेही रूग्णविषयक, रोगविषयक नाव न देता, आनंदवन असे त्याचे नामाभिदान केले. मग आनंदवनात आनंद शोधण्यासाठी बाबांनी जोरदार काम सुरू केलं. त्यांना त्यांच्या कुष्ठरोग्यांनीही तितकीच तोलामोलाची साथ दिली. त्यांच्याच अथक प्रयत्नाने या वाळवंटी जागेत हिरवाई वस्तीला आली. ही किमया घडवली ती अपंग म्हणविल्या जाणार्या कुष्ठरोग्यांनी. सुरवातीला रहाण्यासाठी बांबूच्या सहाय्याने दोन झोपड्या उभारण्यात आल्या. पण त्याला भिंतीच नव्हत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी जंगली प्राणी येण्याची भीती होती. जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे यासाठी आणलेले चारही कुत्रे जंगली प्राण्यांनी एकामागोमाग एक गट्ट्म केले. मग त्यांनी तेथे विहीर खोदण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारी पुरेशी हत्यारेही त्यांच्याकडे नव्हती. तरीही त्यांनी ते काम शिरावर घेतले आणि पूर्ण केले.
|

