* पांढरे मोजे लवकर खराब होतात आणि त्यांच्यावरील डाग लवकर निघत नाही. अशा वेळेला एका मागामध्ये थोडी टूथपेस्ट पाण्यात मिसळा. त्यात हे मोजे भिजवून ठेवा आणि अर्ध्या तासाने धुवा. मोजे पांढरे स्वच्छ होतात. * रेशमी कपडे धुताना त्या पाण्यात थोडेसे डाळीचे पीठ मिसळल्यास साड्यांना आणि चुरचुरीतपणा येतो. * कॉटनच्या साड्यांना स्टार्चशिवाय मजा येत नाही. पण स्टार्च केलेल्या साड्या नेसायला त्रासदायक ठरतात. तरी नेसायच्या आधी ही साडी एक तासभर फ्रीजमध्ये ठेवल्यास कडकपणा कमी होतो. साडी नीट नेसता येते आणि परत कडक होते. * जरीच्या साड्या ठेवून ठेवून त्याची जर काळी पडते, पण उलट घडी घालून पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यास जर काळी पडत नाही. * कपड्यांवर घामाचे डाग पडतात. ते घालवण्यासाठी बादलीभर पाण्यात ऑस्परिनच्या दोन-चार गोळ्या विरघळून घ्याव्यात. त्यात कपडे भिजवून ठेवावेत. डाग जातात. * कॉटनची नवीन साडी धुताना आधी मीठ घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवावी. दहा मिनिटानंतर धुवावी म्हणजे रंग पक्का होतो. * कपड्यांची उसवलेली शिवण दिसू नये म्हणू व्हिनेगरमध्ये स्पंज बुडवून त्यावरून फिरवावा. उसवलेली शिवण दिसेनाशी होते. * लहान मुलांचे कपडे हातरुमाल, साबण व सोडा घातलेल्या पाण्यात प्रेशर कुकरामध्ये एक शिट्टी होईपर्यंत गरम करावे. स्वच्छ निघतात. अंगाला लावायच्या साबणाचे कव्हर कपड्यांमध्ये घालून ठेवावे. छान वास लागतो.