जीवामामाला दारू-सिगारेटचा प्रसाद
देवाला भोग म्हणून नारळ, पेढे किंवा खडीसाखर चढवताना आपण पाहिलं असेल. मंदिरातील भक्तांनाही त्याचाच प्रसाद वाटला जातो. मात्र एखाद्या मंदिरातील देवाला दारू आणि सिगारेटचा भोग चढवताना कधी पाहिलेय, काय बुचकळ्यांत पडलात ना! तुमचा असा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. मात्र हे सत्य आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला नेत आहोत बडोद्याच्या मांजलपूर गावात. या गावात आहे मामा, जीवा मामाचे मंदिर. तसं पाहता गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मात्र आपली मनोकामना पूर्ण झाली तर या मंदिरातील देवाला मात्र भाविकांकडून दारू आणि सिगारेटचा प्रसाद चढविला जातो. नुसतं दारू आणि सिगारेट देऊन चालत नाही तर मामासाठी चक्क बकराही कापला जातो. ही बाब जितकी आश्चर्यचकित करणारी तितकीच गमतीशीरही.
मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती देताना या लहानश्या गावचे रहिवासी भरतभाई सोलंकी यांनी आम्हाला सांगितलं, की काही वर्षांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गावातले झाडून सगळे तरुण बाहेरगावी गेले होते. याचा फायदा उचलत डाकूंनी गाव लुटून नेलं. याच दिवशी शेजारच्या गावातील जीवा नावाचा तरुण आपल्या बहीण आणि भाच्यांना भेटण्यासाठी आलेला होता. गावात डाकूंच्या उच्छाद सहन न झाल्याने या साहसी तरुणाने त्यांच्यावर हल्ला बोल केला. एकटा तरुण डाकूंशी लढत असल्याचे पाहून गावातील इतरांनाही चेव आला आणि सर्वांनी डाकूंना हुसकावून लावले. मात्र या लढ्यात जीवा कामी आला. जीवाने गावासाठी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून गावक-यांनी जीवा मामाचे मंदिर बांधले. कालांतराने गावकरी मंदिरात नवस बोलू लागले आणि ते पूर्ण झाल्यानंतर जीवा मामाला प्रसाद म्हणून दारू आणि सिगारेट चढविण्याची परंपरा सुरू झाली. असे म्हणतात, जीवा मामाला दारू, सिगारेट आणि मांसाहार प्रिय होता. आणि म्हणूनच लोकांकडून हा प्रसाद चढविण्याची पद्धत सुरू झाली आहे. गेल्या काही काही वर्षांपासून मंदिराच्या परिसरात पशूबळीस गबंदी करण्यात आली असली तरीही त्यातून सुटकेचा मार्ग म्हणून येथे पशूंचे काही केस काढून ठेवले जातात. कुणाच्या शेऱ्याची आणि बलिदानाची आठवण त्याचे स्मारक बनविणे ठीक. मात्र या गोष्टीला श्रद्धेशी जोडून असले अवडंबर खरोखर योग्य वाटते का? देव कोणताही असो त्याला मास, मद्य आणि सिगारेटचा भोग चढविणे कितपत योग्य आहे. आजच्या वैज्ञानिक युगात हा प्रकार रूचतो का? तुम्हाला काय वाटतं... आम्हाला नक्की कळवा.