शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By दीपक खंडागळे|

दैत्याला कुलदैवत मानणारे गाव

WD
राम भक्त हनुमानाची पूजा न करता एखाद्या दैत्याची (राक्षस) पूजा करणे योग्य आहे का? दैत्याला आपले कुलदैवत मानून त्याची पूजा-अर्चना केली जावू शकते का? श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला अशाच एका गावाची माहिती देणार आहोत. जिथे या सर्व प्रश्नांचा आपणास उलगडा होईल. हे गाव चक्क राक्षसाला आपले कुलदैवत मानते.

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील 'नांदुर निंबादैत्य' गावात हे भारतातील एकमेव दैत्य म‍ंदिर आहे. येथील लोक दैत्याला आपले कुलदैवत मानून त्याची पूजा करतात. गावात हनुमानाचे एकही मंदिर नसून, हनुमानाच्या नावाचा उच्चार करणे देखील या गावात अपशकून मानला जातो.

प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात नाशिक येथून केदारेश्वराकडे वाल्मिक ऋषींच्या भेटीसाठी जात असताना गावातील जंगलात त्यांचा मुक्काम झाला. या जंगलात त्यावेळी 'निंबादैत्य' राक्षसाचे वास्तव्य होते. या राक्षसाने त्यावेळी प्रभू रामचंद्राची मनोभावे पूजा केली आणि त्यांचा भक्त झाला. तेव्हा प्रभू रामचंद्राने त्याला वर दिला की, या गावात तुझे वास्तव्य राहील आणि गावकरी तुला कुलदैवत मानून तुझी पुजा करतील. तसेच गावात हनुमानाचे मंदिर नसेल. तेव्हापासून या ठिकाणी या दैत्याची गावकरी मनोभावे पूजा करतात.

WD
या गावात कोणत्याही व्यक्तीचे नाव मारूती, हनुमान असे ठेवले जात नाही. आश्चर्य म्हणजे, दुसरा कुणी व्यक्ती या गावात वास्तव्यास आला तर त्याचे नाव मारूती असल्यास ते नाव बदलून दुसरे नाव ठेवले जाते. याविषयी अधिक माहिती देताना गावातील शिक्षक एकनाथ जनार्दन पालवे यांनी सांगितले, की दोन महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील एक कामगार गावात कामासाठी आला होता. त्याचे नाव मारूती होते. पण गावकर्‍यांना त्याचे नाव माहित नव्हते.

दोन तीन दिवसानंतर तो कामगार स्मशानभूमीत चित्रविचित्र आवाज काढून उड्या मारू लागला. त्याचा आवाज ऐकूण सर्व गावकरी जमले आणि त्याला नाव विचारले असता त्याने मारूती असे सांगितले. त्यावर गावकरी त्याला म‍ंदिरात घेऊन गेले आणि दैत्याची पूजा करून त्याचे नाव लक्ष्मण ठेवण्यात आले. त्यानंतर तो शांत झाला.

या गावातील लोक मारूती नावाचे कोणतेही वाहन वापरत नाहीत. कारण, गावातील डॉक्टर देशमुख यांनी चारचाकी गाडी खरेदी केली होती. परंतु, आठ दिवसांत त्यांना चमत्कार घडला आणि त्यांना आपली गाडी विकावी लागली. एकदा उसाने भरलेला एक ट्रक शेतात फसला होता. गावकर्‍यांनी दोन ट्रक्टर लावून ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रक मात्र जागचा हलेना. त्यानंतर कुणीतरी ट्रकमध्ये मारूतीचा फोटो असल्याचे सांगितले. तो फोटो बाहेर काढल्यानंतर दोन ट्रक्‍टरने ट्रक बाहेर निघत नव्हता तो एका ट्रक्टरने बाहेर आला.

WD
हे गाव 90 टक्के साक्षर असून प्रत्येक कुटूंबातील एक व्यक्ती नोकरीनिमित्त गावाबाहेर आहे. परंतु, निंबादैत्याच्या यात्रेला गावातील प्रत्येक जण हजर राहत असल्याचे पोलिस कॉन्सटेबल अविनाश गर्जे यांनी सांगितले.

या मंदिराचे बांधकाम प्राचीन काळातील असून सर्व बांधकाम दगडाने केलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून मंदिरासमोर पाचशे वर्षापूर्वीचे जुने वडाचे झाड आहे. गावच्या नदी किनारी असलेले हे मंदिर दुमजली असून गावात मंदिराशिवाय दुसरी कोणतीही दुमजली इमारत नाही.

तसेच गावातील प्रत्येक घरांवर आणि दुचाकी गाड्यांवर 'निंबादैत्य कृपा' असे लिहल्याचे दिसून येते. सामान्यत: आपण रामकृपा, देवाची कृपा किंवा ईश्वर कृपा असे लिहतो. मात्र येथील गावकरी दैत्य (राक्षस) प्रसन्न असे लिहितात.

या गावचे दुसरे एक वैशिष्टय म्हणजे, गावात सर्व जातीधर्माचे लोक रहात असले तरी तेली आणि कुंभार समाजाचे कुणीही येथे राहत नाही. या ठिकाणी तेलघाणा आणि कुंभार भट्टीचे काम चालत नाही, असे गावचे सरपंच दिगंबर मोहन गाडे यांनी सांगितले. मंदिराच्या पाठीमागे महादेव, शनी, महालक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिरालगत असलेल्या विहिरीत संत भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरीचे वाचन केले होते, असे गावकर्‍यांनी सांगितले.

पाथर्डीपासून 23 किलोमीटर पूर्वेला श्री श्रेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत हे ठिकाण आहे. या देवस्थानचा नुकताच तिर्थक्षेत्रात समावेश झाला आहे. या गावात गुढीपाडव्याला निंबादैत्य महाराजांची मोठी यात्रा भरते.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....