गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

नाग-नागिणीची चमत्कारी समाधी

WD
श्रद्धा असेल तिथे शंका कसली. मात्र नाग-नागिणीचे प्रेम, चमत्कार आणि त्यांच्याबद़दलचे किस्से सध्याच्या प्रगत युगात योग्य वाटतात? हा प्रश्न निश्चितच गंभीर आहे.

आज आम्ही तुम्हाला अशीच एक आगळी-वेगळी घटना सांगणार आहोत. गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात मांजलपूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. जिथे आहे एक वैशिष्‍टयपूर्ण समाधी. ही समाधी कुणा महापुरुषाची किंवा साधू-संताची नाही, तर एका नाग-नागिणीची आहे.

WD
या नाग-नागीण मंदिराचे संचालक हरमनभाई सोलंकी यांनी याबददल 'वेबदुनिया'ला सांगितले, की 2002 च्या पवित्र श्रावण महिन्यात मांजलपूर गावाजवळ एक चमत्कारी घटना घडली. बडोद्यातील मंजुलापार्क भागातील रहिवासी पारेख कुटुंब देवदर्शन करून घरी परतत असताना अचानक रस्त्यात त्याच्या गाडीखाली रस्ता ओलांडणारे नाग-नागिणीचे जोडपे आले. त्यातील नागीण जागीच ठार झाली. हा धक्का सहन न झालेल्या नागानेही रस्त्यातच फणा आपटून प्राणत्याग केला.

हृदय पिळवटून टाकणा-या या घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले. यावेळी काही जुन्या जाणत्या लोकांनी या प्रेमी जोडप्याच्या प्रेमाची आणि बलिदानाची स्मृती म्हणून त्यांची समाधी बनविण्याचा सल्ला दिला. असं म्हणतात समाधी बनविल्याच्या दुस-याच दिवशी येथे जोरदार स्फोट झाला आणि समाधीची माती 2-3 फूट आत ढासळली. या घटनेकडे स्थानिक लोक आजही चमत्कार म्हणून बघतात.

WD
मंदिराच्या पुजारीने सांगितले की इथं नेहमीच असे चमत्कार होत असतात. त्यांनी सांगितलं, की सात वर्षांपूर्वी जेव्हा एका भाविकाने समाधीवर नारळ फोडलं तर त्यातून दोन खोब-याच्या वाट्या निघाल्या. तर एका भाविकाने अर्पण केलेल्या नारळात दोन डोळे आढळून आले. या सर्व घटना नाग देवतेचा चमत्कार असल्याचे मानून मंदिरातच त्यांची स्थापना करण्यात आली आहे.

नाग-नागिणीच्या या प्रेमरूपी स्मारकात लोकांची गाढ श्रद्धा आहे. दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी येतात. आणि आजवर कुणालाही प्रेमी नाग युगालाने निराश केलेले नाही. सुख, समृद्धी आणि व्यवसायात यश मिळविण्यापासून पुत्रप्राप्ती पर्यंत अनेक इच्छा भाविक येथे बोलून दाखवितात.

WD
भारतासारख्या देशात अशा सारख्‍या घटना अगदी सामान्य असल्या तरीही येथे प्रत्येक वेगळी घटना श्रद्धा आणि धर्माशी जोडून पाहिली जाते. या सारख्या घटनांमध्ये श्रद्धा किती आणि अंधश्रद्धा किती हे सांगणे कठीण आहे. एका सामान्य घटनेला रंगवून केवळ लोकांच्या श्रद्धेशी खेळ केला जातोय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्‍की कळवा...