बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2019 (10:17 IST)

फोर्ब्सच्या यादीत भारतातील 57 कंपन्यांचा समावेश

जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या फोर्ब्सच्या यादीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. 
 
फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.
 
पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या यादीत टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एल अँड टी, भारतीय स्टेट बँक आणि एनटीपीसीला पहिल्या 500 कंपन्यांच्या यादीत स्थान दिले आहे. तर 2000 कंपन्यांच्या यादीत टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, पावर ग्रिड, हिंदाल्को, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब नेशनल बँक, ग्रासिम, बँक ऑफ बडोदा, पावर फायनॅन्स आणि कॅनरा बँकेचा समावेश आहे.