सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (13:23 IST)

अमूलनंतर मदर डेअरीनेही दुधाची किंमत वाढविली

अमूल दुधानंतर आता मदर डेअरीनेही दिल्ली-एनसीआरसाठी दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. नवीन किंमती 11 जुलै 2021 म्हणजेच रविवारपासून लागू होतील. मदर डेअरीने दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारच्या दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढले आहेत. मदर डेअरीने अखेर डिसेंबर 2019 मध्ये किंमती वाढवल्या होत्या.
 
यापूर्वी जुलैच्या सुरूवातीला अमूल दुधानेही दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने (जीसीएमएमएफ) 30 जून रोजी याबाबत माहिती दिली होती.
 
वाढती किंमत आणि वाहतुकीमुळे दुग्ध कंपन्यांना दुधाचे दर वाढवावे लागत आहेत. जीसीएमएमएफने दिलेल्या अधिकृत माहितीत असे म्हटले होते की दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपये वाढ म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ दरामध्ये 4 टक्के वाढ. हे सरासरी महागाई दरापेक्षा कमी आहे. अमूलने गेल्या दीड वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये दुधाच्या किंमती वाढविल्या होत्या.
 
दुधाच्या किंमतीतील वाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशातच होणारच तर पशुपालक आणि दुग्धशाळेशी संबंधित लोकांना यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. या क्षेत्राला दुधाच्या किंमतीत वाढ होण्याची अपेक्षा होती. पशू उत्पादकांचे म्हणणे आहे की बर्‍याच दिवसांपासून दुधाची किंमत वाढली नाही. उन्हाळ्याच्या काळात दुधाचे उत्पादनही कमी होते. दुसरीकडे डिझेल आणि जनावरांच्या चारा आणि औषधांचे दरही वाढले आहेत.
 
अमूलने किंमत वाढवताना सांगितले होते की, शेतकर्‍यांकडून दूध खरेदीच्या किंमतीत 6 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यांना प्रत्येक रुपयापैकी 80 पैसे दिले जातात. अशा परिस्थितीत आता किंमत वाढवून त्यांना फायदा होईल.