एअर इंडिया ४ मेपासून बुकिंग सुरू करणार
भारतातील सरकारी हवाई वाहतूक कंपनी असेलल्या एअर इंडियाने येत्या ४ मेपासून विमान प्रवासाच्या तिकिटांचं बुकिंग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर यासंदर्भात संदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याचा उल्लेख या संदेशात करण्यात आला आहे.
एअर इंडियाने ४ मेपासून काही निवडक देशांतर्गत अर्थात डोमेस्टिक विमानांच्या तिकिटांचं बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. त्यासोबतच १ जूनपासून अशाच प्रकारे काही निवडक आंतरराष्ट्रीय विमानांचं तिकीट बुकिंग देखील सुरू करण्याची घोषणा कंपनीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे.
वेबसाईटवर, ‘जगभरात फैलावलेल्या या साथीच्या रोगामुळे आम्ही आंतरदेशीय विमानाचे बुकिंग ३ मे पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे बुकिंग ३१ मे २०२०पर्यंत बंद ठेवले आहेत. पण त्यानंतर निवडक आंतरदेशीय विमानांचे बुकिंग ४ मेपासून आणि निवडक आंतरराष्ट्रीय विमानांचे तिकीट बुकिंग १ जून २०२०पासून सुरू असणार आहेत. कोरोनासंदर्भातल्या परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेऊन आहोत. यासंदर्भात वेळोवेळी तुम्हाला माहिती देतच राहू’, असं या संदेशात नमूद केलं आहे.