दृष्टिहीनांना सहज ओळखू येण्यासाठी चलनी नोटांमध्ये बदल : रिझर्व्ह बँक
नवीन चलनी नोटा- नाणी ओळखण्यात आणि त्यात फरक करण्यात दृष्टिहीनांना अडचणी येत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने म्हटलं की, दृष्टिहीनांना सहज ओळखता येतील अशाच पद्धतीने नवीन चलनी नोटांमध्ये बदल करण्यात आल्याचा आणि हा बदल दृष्टीहीनांसाठी कार्यरत संघटनांना विचारात घेऊनच करण्यात आला.
पूर्वीच्या नोटा आणि नाणी वेगवेगळय़ा आकाराच्या होत्या. त्यामुळे दृष्टिहीनांना त्या सहजपणे ओळखता येत होत्या. नवीन नोटा आणि नाण्यांचा आकार लहान करण्यात आलेला आहे. परिणामी दृष्टिहीनांना त्या ओळखणे कठीण जाते, असे याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले.
रिझव्र्ह बँकेने चलनी नोटांमध्ये ओळख चिन्हे आणि उंचावलेल्या रेषांसह स्पर्श केल्यावर ठळकपणे जाणवतील असे बदल दृष्टिहीनांसाठी केले आहेत. त्यानुसार, 100 रुपयांच्या नोटेमध्ये त्रिकोण आणि चार रेषा आहेत, 500 रुपयांच्या नोटेत वर्तुळ आणि पाच रेषा आहेत आणि दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये आयत आणि सात रेषा आहेत.