1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (22:29 IST)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली.
 
परिवहन मंत्री श्री. परब म्हणाले, या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक 
सहकार्याबद्दल मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांचे श्री.परब यांनी आभार मानले.
 
महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे श्री. परब यांनी यावेळी सांगितले.