सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (07:51 IST)

पुण्याजवळील रांजणगाव मध्ये होणार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर; केंद्र सरकारची घोषणा

rajiv chandra sekhar
पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाण्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत केली.
 
येथील सीजीओ कॉमप्लेक्स मधील सीइजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल तसेच सीडॅक च्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची महत्वाची घोषणा केली.
 
रांजणगाव (फेस III) येथील होऊ घातलेल्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मुळे येत्या काळात जवळपास 5 हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचे श्री चंद्रशेखर म्हणाले. या प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा केले असल्याचे श्री चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.
 
ईएमसीच्या प्रकल्प विकासासाठी एकूण 492.85 कोटी रूपये अंदाजित खर्च येणार असून 207.98 कोटी रूपयें केंद्र सरकार तर 284.87 कोटी रूपये महाराष्ट्र शासनच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाव्दारे गुंतव‍िले जातील. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 2 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक भविष्यात आकर्षीत केली जाणार असल्याचेही श्री चंद्रशेखर यांनी सांगितले.

Edited by : Ratnadeep Ranshoor