बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (13:42 IST)

विवाहितांसाठी आर्थिक नियोजन

‘लग्नानंतरचं आयुष्य कसं यशस्वी करायचं,’ याबाबत एखाद्या विवाहित दाम्पत्याला अनेक सल्ले दिले जातात. त्याचवेळी, त्यांना ‘पैसे कसे खर्च करावे?’ आणि ‘कशी बचत करावी?’ या प्रश्नांनाही तोंड द्यावं लागतं. कमावणे आणि खर्च करणे या दोन्ही बाजूंचा समतोल राखता-राखता आर्थिक ध्येय एकत्रितपणे निश्चित करणे पण महत्त्वाचे असते. या जोडप्यांना मदत करण्यासाठी येथे काही सल्ले देत आहोत.

आर्थिक गोष्टीचं मोल आणि ध्येयाबाबत चर्चा करा: पैसे हा खूपच संवेदनशील विषय असल्यामुळे बहुतांश जोडपी त्याबद्दल पारदर्शकपणे बोलणंच टाळतात. तरीसुद्धा एकत्रितपणे आर्थिक ध्येय ठरवण्याच्या दृष्टिने त्याबाबत पारदर्शकपणे बोलणे गरजेचे आहे. परस्परांना जाणून घेताना पैसे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. एकमेकांना व्यवस्थित जाणून घेतल्यानंतर त्यांची पैशाबद्दलची मते काय आहेत हे त्यांनी परस्परांना सांगितले पाहिजे. दोघांच्या समंतीने त्यांनी आर्थिक ध्येयांसह एक कार्यक्रम निश्चित करायला हवा आणि ती ध्येय प्राप्त करण्याचा मार्गही निश्चित करायला हवा.

बचतीचे उद्दिष्ट: जेव्हा पती-पत्नी दोघेही कमावते असतात तेव्हा अधिक पैसा घरात येतो. जास्त पैसा आला की, आपोआपच छानछौकी आणि उधळेपणा वाढतो. बरेच जण ‘खर्चाचं बजेट’ तयार करतात.  जोपर्यंत अनपेक्षित खर्च मान वर काढत नाहीत तोपर्यंत असं खर्चाच नियोजन साधारणपणे फोल ठरत नाही, पण जेव्हा हे खर्च येतात तेव्हा खर्चाच नियोजन उधळलं जातं. अशी वेळ येऊ नये म्हणून ‘बचतीचे बजेट’ तयार करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. या बचतीच्या बजेटचे मुख्य सूत्र असेल ‘सर्वप्रथम तुमच्यासाठी बचत करा’ हे ‘सर्वप्रथम तुमच्यासाठी बचत करा?’ काय असतं?. या संकल्पनेत एखादी व्यक्ती दर महिन्याला त्याच्या कमाईच्या ठराविक टक्के रक्कम सर्वांत पहिल्यांदा स्वत:साठी राखून ठेवतो, जेणेकरून त्याने निश्चित केलेले आर्थिक ध्येय गाठण्याच्या दिशेने तो वाटचाल करू शकतो. कमाईतील उर्वरित रक्कम कोणतीही अपराधी भावना न बाळगता तो इतर खर्चांसाठी वापरू शकतो.

ध्येयसाध्य करण्यासाठी गुंतवणूक करा: गुंतवणुकीचे ध्येय लघु टप्प्यातील म्हणजे दोन वर्षात पूर्ण होईल असे जसे कार विकत घेणे, मध्यम टप्प्यातील म्हणजे दोन ते पाच वर्षांत पूर्ण होईल असे जसे की, घर विकत घेणे आणि दीर्घ टप्प्यातील म्हणजे जे पूर्ण होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लागेल असे म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणाची किंवा तुमच्या निवृत्तीनंतरची तरतूद करणे.

आपण निश्चित केलेली आर्थिक ध्येये पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपत्कालीन निधीची व्यवस्था करणे खूप महत्त्वाचे असते. कदाचित नोकरी जाणे किंवा अचानक एखादा अपघात होणे अशा परिस्थितीत हा आपत्कालीन निधी उपयोगी पडू शकतो. तुमचा वैयक्तिक खर्च ज्यामध्ये ईएमआय, विम्याचे हप्ते आणि इतर निश्चित खर्च यांचा समावेश आहे असा सहा महिन्यांचा तुमचा वैयक्तिक खर्च जितका होतो तेवढा तुमचा आपत्कालीन निधी असायला हवा. त्यामुळे जरी तुमची नोकरी गेली तरीही तुमचे आर्थिक स्थैर्य टिकेल. तुमच्या बँकेतील बचत खात्यात दोन महिने घरखर्च चालू शकेल एवढी रक्कम असायला हवी जी सहजपणे काढता येईल त्याचबरोबर उर्वरित रक्कम लिक्विड फंडात गुंतवावी जी एका दिवसात काढता येऊ शकते.

सहअनुभूतीत गुंतवणूक करा: जगाचा सध्याचा वेग पाहता नवविवाहितांनी परस्परांना दर्जेदार वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक जोडपं म्हणून तुम्हाला दोघांना ज्या गोष्टींचा मनमुराद आनंद लुटता येईल अशा अनुभवांत आणि अॅक्टिव्हिटिमध्ये पैसे खर्च करणे ही एक उत्तम गुंतवणूक आहे. या अनुभवांसाठी पैशांची बचत करून ते लिक्विड फंडात ठेवावे, जेणेकरून ते सहजपणे वापरता येतील त्यामुळे त्या जोडप्यातील संबंध घनिष्ठ आणि तणावरहित राहतील.

संपत्ती निर्माण करणे: संपत्ती खरेदी करण्यावर लक्ष केंद्रीत करताना जोडप्यांनी कर्ज काढण्यासाठी एक निश्चित मर्यादा पक्की करून घ्यावी आणि ती पाळावी. जोडप्याने त्यांच्या निव्वळ कमाईच्या ३० टक्क्यांहून अधिक रक्कम ईएमआयवर खर्च करू नये. ही मर्यादा ओलांडली गेली तर हातात पैसा राहत नाही. ते जोडपी धोरणीपणाने कोणत्या आकाराची कार घ्यायची हे ठरवू शकतं आणि एक विशिष्ट व्यावसायिक पातळी गाठल्यानंतरच घर विकत घेण्याचा विचार या जोडप्याने करावा.

विमा:
जीवन विमा: तुमच्या कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून व्यक्तींच्या संख्येनुसार (मुले, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी पत्नी) पुरेसा जीवन विमा घेण्याबद्दल निर्णय घ्यावा. जोडप्याने जीवन विम्याच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी टर्म विमा योजना विकत (ऑनलाइन पॉलिसी या कमी खर्चिक आहेत) घ्यावा. जोडप्याची आर्थिक उद्दिष्ट्ये, कमाईची गरज आणि त्यांच्यावर असलेल्या इतर जबाबदाऱ्या यांचा अंदाज घेऊन आर्थिक नियोजन सल्लागार त्यांना किती विमा संरक्षण घेणे गरजेचे आहे हे सांगू शकतो. त्यांनी शक्यतो गुंतवणुकीच्या हेतूने तयार केलेल्या विमा योजना घेणे टाळावे ज्यामध्ये त्यांना अधिक विमा हप्ता भरावा लागतो, त्याच्या तुलनेत पुरेसे विमा संरक्षण मिळत नाही.

आरोग्य विमा: कंपनीने जरी दोघांना एकत्रित संरक्षण देणारा आरोग्य विमा दिलेला असला तरीही त्यांनी स्वतंत्र एकेक विमा योजना खेरदी करून ठेवाव्या असा सल्ला मी देईन. जर दोघांपैकी एकाने नोकरीचा राजीनामा दिला तरीही दोघांना विमा संरक्षण मिळेल. अतिरिक्त संरक्षण म्हणून ते गंभीर आजार किंवा अपघात संरक्षण विमा घेऊ शकतात. पुन्हा एकदा सांगेन की, कोणतीही विमा योजना खरेदी करण्यापूर्वी अर्थ सल्लागाराचा सल्ला घेणे उचित ठरेल.

जोडपी जेव्हा DIY (आमचं आम्हीच करू) हे धोरण जेव्हा अवलंबतात, तेव्हा त्यांना खूप महागात पडते. जोडप्यांसाठी आर्थिक नियोजन करणे हा जरी महत्त्वाचा विषय असला तरीही तो एका लेखात पूर्ण करणे शक्य नाही. अर्थ सल्लागाराची किंवा ऑनलाइन अर्थ सल्ला देणाऱ्या वेबसाइटची सेवा तुम्ही वापरा त्यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी एक सल्लागार तुम्हाला मदत करेल.

लेखक : अमर पंडित (फाउंडर हॅप्पीनेस फ्रॅक्ट्री)