गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (11:32 IST)

इंधन दरवाढ सुरूच ; मुंबईत पेट्रोलचा भाव ८५ रुपयांवर

सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८५.२१ रुपये झाले. गुरुवारी पेट्रोलचा भाव ८४.६६ रुपये होता. त्यात ५५ पैशांची वाढ झाली. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७५.५३ रुपये झाला आहे. यापूर्वी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
 
मुंबईत पेट्रोलने ८५ ची पातळी ओलांडली आहे. आज पेट्रोलचा एक लीटरचा भाव ८५.२१ रुपयांवर गेला आहे. गेल्या २० महिन्यांतील हा सर्वाधिक दर आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पेट्रोल ८५ रुपयांवर गेले होते. दिल्लीत पेट्रोलचा दर ७८.३७ रुपये झाला आहे. गुरुवारी तो ७७.८१ रुपये झाला आहे. आज त्यात ५६ पैशांची वाढ झाली. आजचा डिझेलचा भाव ७७.०६ रुपये झाला आहे. त्यात ६३ पैशांची वाढ झाली.
 
कोलकात्यात पेट्रोल ८० रुपयांवर गेले आहे. आज कोलकात्यातील पेट्रोलचा भाव ८०.१३ रुपये झाला आहे. कोलकात्यात डिझेल ७२.५३ रुपये झाला. गुरुवारी तो ७१.९६ रुपये होता.चेन्नईत पेट्रोल ८१.८२ रुपयांवर गेले आहे. चेन्नईत डिझेलचा दर ७४.७७ रुपये झाला आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ३८ डाॅलर आहे.
 
टाळेबंदीने सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल आटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात देखील वाढ केली. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
 
करोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजचा इंधन आढावा बंद स्थगित केला होता.
तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी ७ जून रोजी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. मागील दोन महिने कठोर टाळेबंदीने रस्ते वाहतुकीवर निर्बंध होते. यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या.