बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (11:00 IST)

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीत प्रति लिटर 18 रुपयांची, तर डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.. मोदी सरकारने मार्च महिन्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या एक्साईज ड्यूटीत वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचा भडका उडणार आहे. इंधनाची किंमत वाढल्याने याचा भार सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे.
 
कच्चा तेलाच्या किमती 30 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहिली आणि सरकारने एक्साईज ड्यूटीत कोणतीही वाढ न केल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती जवळपास 10 ते 12 रुपये प्रति लिटर कमी होऊ शकते, असा अंदाज माध्यमांमध्ये आलेल्या अहवालात वर्तवण्यात आला होता. मात्र, सरकारने एक्साईज ड्यूटी वाढवल्याने इंधन दर कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. आधीच कोलमडलेल्या आर्थिक स्थितीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळेच आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी सरकारने ही वाढ केल्याचं बोललं जात आहे.