मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (13:50 IST)

आपातकालीन निधी कसा उभारावा?

आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी आपण काही योजना आखतो. नवीन घर, नवी गाडी, लग्न, आलीशान हॉलीडेज्, आपल्या मुलांचे शिक्षण आणि आपली निवृत्ती. योग्य धोरणात्मक गुंतवणूक योजना आखून आपण महागाईवरही मात करतो. तरीही, आयुष्यात आपल्या नियोजनानुसार सारे काही होत नाही. आजारपण, आर्थिक अडचणी, अपघात, प्रियजनांचा मृत्यू आदी गोष्टी अचानक उद्भवतात. अशी परिस्थिती मानसिक व भावनिकदृष्ट्या कठीण असते. यात आपला बचतीचा पैसा खर्च होतो आणि काही वेळा काम करण्याची आपली क्षमताही निघून जाते. 
 
अशा परिस्थितीशी कुणालाही सामना करावा लागू नये, अशी आपली इच्छा असली तरीही, अशा आपातकालीन घटनांसाठी आपली आर्थिक तयारी असणे आवश्यक असते. जेव्हा आपण आपातकालीन निधी उभारून ठेवतो, तेव्हा आयुष्यात अचानक आलेल्या अडचणींवर आपण सहज मात करू शकतो. पण, आपल्याला आपातकालीन स्थितीबद्दल किंचीतही कल्पना नसेल, तर त्यासाठी पैसा उभा कसा करावा, हा अगदी स्वाभाविक प्रश्न पडतो. आर्थिक संकटापासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी खाली आम्ही काही टिप्स देत आहोत – 
 
आपातकालीन निधीचे नियोजन
घरभाडे, गरजेच्‍या वस्तू, बिले, खाद्यपदार्थ, फी, विमा, कर्ज परतावा, दळणवळण आणि व्यक्तीगत खर्च यांचा प्रथम आराखडा मांडावा व त्यासाठी पैसे बाजूला काढावेत. त्यानंतर, आपले एकूण उत्पन्न म्हणजेच, पगार, व्याज, बोनस आदींचे गणित मांडावे. एकदा आपण उत्पन्न आणि खर्च यांचे गणित मांडले की, आपण आपला आपातकालीन निधी सहज उभा करू शकतो.
 
आपातकालीन निधीसाठी बचत करणे
आपल्या 5 ते 6 महिन्यांच्या खर्चाइतका आपातकालीन निधी जमा करण्याचा सल्ला देण्यात येतो. आपातकालीन परिस्थितीदरम्यान पुन्हा पूर्वपदावर येईपर्यंत आपले नेहमीचे गरजेचे खर्च, मासिक खर्च व्यवस्थित करता येणे आवश्यक असते. महिन्याच्या आपल्या एकूण उत्पन्नापैकी एक ठराविक रक्कम आपातकालीन गरजांसाठी बाजूला ठेवून उरलेल्या रकमेत खर्च भागवणे आवश्यक असते. तुम्हाला बोनस मिळाला, तर त्यातला काही भाग आपातकालीन निधी म्हणून गुंतवून ठेवावा, जेणेकरून अशा परिस्थितीत पैसा गोळा करण्याचा ताण येणार नाही.
 
आपातकालीन निधीसाठी गुंतवणूक करणे
मासिक उत्पन्नातील काही रक्कम बाजूला काढून दर महिन्याला ठराविक रक्कम व्यवस्थित गुंतवून आपण आपल्या आपातकालीन निधीची उभारणी सुरू करू शकतो. आपातकालीन घटनांसाठी गुंतवणूक पर्याय निवडताना, त्या योजना किंवा पर्याय सुरक्षित आणि सहज उपलब्ध होणारे आहेत ना, याची खात्री करावी. म्हणूनच, लिक्विड गुंतवणूकीचे परतावे फार मिळत नसले तरीही, किमान धोका आणि लिक्विड गुंतवणूक पर्याय निवडावा. या कारणासाठी बॅंकेतील बचतखाते किंवा लिक्विड म्युच्युअल फंड हे पर्याय योग्य ठरू शकतात. लिक्विड किंवा अल्ट्रा-शॉर्ट टर्म म्युच्युअल फंड कर परताव्याच्या दृष्टीनेही फायदेशीर असून आपल्या उत्पन्नातील बराचसा भाग यासाठी राखून ठेवणे हितावह ठरते ही बाब ध्यानात घ्यायला हवी.
 
आपातकालीन निधी ठरवण्यास कारणीभूत अन्य घटक
केवळ बचतीवरच तुमच्या आपातकालीन निधीची तुमची जबाबदारी थांबत नाही. आपल्या आपातकालीन निधींची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक असून जीवनशैलीतील बदलानुसार वा अन्य घटकांनुसार यात बदल होणेही आवश्यक ठरते. याव्यतिरिक्त, कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे वित्तीय स्थैर्य, वय, आरोग्य, नोकरीची सुनिश्चितता, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींची संख्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या हेही घटक महत्वाचे ठरतात. जर आपण उद्योजक असाल, तर उद्योगातील आपातकालीन स्थितीत तग धरण्यासाठी आगाऊ नियोजन असणे फारच गरजेचे असते.
 
आपला आपातकालीन निधी खर्च करू नका
आपातकालीन गरजांसाठी बाजूला ठेवलेला पैसा खर्च करण्याचा मोह बऱ्याचदा होऊ शकतो. हॉलीडे किंवा नियोजित नसलेली एखादी खरेदी यासाठी हा पैसा खर्च केला जातो. तरीही, हा पैसा लिक्विड रक्कम नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय ही रक्कम खर्च करू नये.
 
पावसाळी दिवसांसाठी बचत करणे किंवा विशेष निधी जमा करून ठेवणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या कुटुंबाचे यामुळे रक्षण होते. इतकेच नव्हे तर, गरजेच्या वेळी दीर्घकालीन गुंतवणूक मोडण्याची वेळही यामुळे आपल्यावर येत नाही.

“ हा लेख श्री अमर पंडित, सीएफए, happynessfactory.in चे संस्थापक यांनी लिहिला आहे”