शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:03 IST)

फक्त अडीच महिन्यात कलिंगड शेतीतुन 13 लाखांची जंगी कमाई

Watermelon
गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा कसोटीने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील (Dhule Farmer) एक शेतकरी (Farmer) प्रेरणादायी ठरत आहे.
 
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या मौजे पाटण येथील सागर पवार या शेतकऱ्याने 5 एकर क्षेत्रावर कलिंगड (Watermelon Farming) पिकाची लागवड केली होती.
 
दोन-अडीच महिन्यांत उत्पादन देण्यासाठी तयार होणाऱ्या या हंगामी पिकातून या अवलिया शेतकऱ्याने सव्वा दोन महिन्यात तब्बल 13 लाख रुपयांची कमाई केली आहे.
 
यामुळे या शेतकऱ्याचे पंचक्रोशीत मोठे कौतुक केले जात आहे. सागर यांनी बीएससी एग्रीकल्चर (Bsc Agriculture) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुशिक्षित असूनही त्यांचे शेतीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. यामुळे तो वडिलोपार्जित शेती कसू लागला.
 
सागर यांच्या शेतात कापूस, भाजीपाला वर्गीय पिके, कांदा यांसारख्या पिकांची शेती होत असे. मात्र, या पिकातून मिळणारे उत्पन्न आणि उत्पादन खर्च यामध्ये नेहमीच तफावत राहिली आहे. यातून सागर यांना शेतीत काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचली.
 
ते वारंवार आपल्या शेतीत नावीन्यपूर्ण बदल करत असत. असाच बदल करत-करत त्यांनी कलिंगड लागवडीचा (Watermelon Cultivation) निर्णय घेतला आणि आपल्या पाच एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली. सागर यांच्याकडे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
 
यामुळे त्यांनी कलिंगड या हंगामी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून कलिंगड ची शेती यशस्वी करून दाखवली.
 
कलिंगड पिकासाठी सागर यांनी सुयोग्य नियोजन आखले आणि आपल्या नियोजनाच्या जोरावरच सागर यांनी केवळ 75 दिवसात कलिंगड चे यशस्वी उत्पादन घेतले.
 
सागर कलिंगड पिकाला दर दहा दिवसाच्या अंतराने खतांची मात्रा पुरवत असत यामुळे सागरला चांगली बक्कळ कमाई झाली.
 
सागर यांनी अडीच महिन्यात उत्पादित केलेले कलिंगड स्थानिक बाजारपेठेत न पाठवता सरळ दिल्ली रवाना केले. त्यांनी दिल्लीतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात आपला कलिंगड विक्रीसाठी नेला.
 
यामुळे त्यांना चांगला नफा मिळाल्याचे समजत आहे. सागर यांनी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कलिंगडची लागवड केली.
 
लागवड करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला गेला. यानंतर सागर यांनी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोंबडी खत पिकाला देण्याच ठरवलं.
 
एक एकर क्षेत्रात त्यांनी आठ हजार कलिंगड ची रोपे लावली अर्थातच पाच एकर क्षेत्रात चाळीस हजार रोपे कलिंगडची त्यांनी लावली.
 
मल्चिंग पेपर चांगल्या दर्जाचा वापरला यामुळे पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन थांबले. सागर यांनी केलेल्या या योग्य नियोजनामुळे त्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले आणि अवघ्या अडीच महिन्यात 13 लाख 32 हजारांची कमाई झाली.