शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (09:43 IST)

थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरा, महावितरणकडून नवी योजना जाहीर

कोरोना काळातील  थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरण्यासाठी महावितरणकडून नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. कृषी ग्राहक वगळून इतर सर्व उच्च आणि लघुदाब ग्राहकांना केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. थकबाकीमुळे वीजजोड तोडलेल्या त्याचप्रमाणे वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीज ग्राहकांनाही काही अटींवर योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात ९८ लाखांहून अधिक ग्राहकांनी एकदाही वीजदेयक भरले नाही. त्यामुळे महावितरणची थकबाकी ५८ हजार कोटींच्याही पुढे गेला आहे. त्यात लघु आणि उच्चदाब ग्राहकांकडे १५ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांसाठी ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.
 
हप्त्याने वीजदेयक भरण्याच्या नव्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उच्चदाब ग्राहकांना मंडल कार्यालय, २० किलोव्ॉटपेक्षा अधिक वीजभार असलेल्यांना विभागीय कार्यालय, तर २० किलोव्ॉटपर्यंतच्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. चालू वीजदेयकांच्या रकमेचे हप्ते करून देण्याबाबत ग्राहकाच्या अर्जावर सात दिवसांत, तर वीजजोड तोडलेल्या थकबाकीदारांच्या अर्जावर पंधरा दिवसांत कार्यवाही पूर्ण केली जाईल. महावितरणच्या संकेतस्थळावर या योजनेबाबत लवकरच स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारेही ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध असेल. न्यायप्रविष्ट प्रकरणातून विनाअट माघार घेण्यास तयार असलेल्या वीजग्राहकांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. भारतीय विद्युत कायदा २००३ अनुसार वीजचोरीच्या कलमानुसार वीजचोरीची रक्कम भरून उर्वरित थकबाकी भरण्यासाठी संबंधित ग्राहकांना योजनेत सहभागी होता येईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.