सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (08:24 IST)

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा, आता १ लाखांपर्यंत पैसे काढता येणार

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पंजाब अँड महाराष्ट्रा को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसी बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलासा दिला आहे. या बँकेतून खातेदारांना पैसे काढण्याची मर्यादा आत्तापर्यंत फक्त ५० हजार इतकी होती. आता ती मर्यादा वाढवून १ लाख करण्यात आली आहे. आरबीआयने काही महिन्यांपूर्वी पीएमसी बँकेवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पीएमसी बँकेचे लाखो खातेदार हवालदिल झाले होते.

प्रारंभी ही मर्यादा १० हजार होती. त्यानंतर ती वाढवून ५० हजार करण्यात आली होती. आता ती मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे पैसे काढण्याची मर्यादा जरी आरबीआयने वाढवली असली, तरी त्यासोबत बँकेवरचे निर्बंध अजून ६ महिन्यांसाठी म्हणजे २२ डिसेंबर २०२०पर्यंत वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांवर टांगती तलवार मात्र कायम आहे.