शुक्रवार, 1 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (10:09 IST)

साखर 'इतक्या' रुपयांनी महागणार?

Sugar will be expensive by 'so much' rupees केंद्र सरकारने साखर कारखान्यांना चालू हंगामात 30 सप्टेंबरपर्यंत 6.1 दशलक्ष मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. तर, गेल्या वर्षी त्यांना विक्रमी 11.1 दशलक्ष मेट्रिक टन साखरेची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. यंदा ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महागण्याची शक्यता आहे.
 
देशात महागाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. डाळी, तांदूळ, गहू, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांनंतर आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. गेल्या 15 दिवसांत त्याची किंमत 3 टक्क्यांनी वाढली आहे. मंगळवारी साखरेचे भाव 37,760 रुपये ($454.80) प्रति टन पर्यंत वाढले, जे ऑक्टोबर 2017 नंतरचे सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे साखरेच्या किमतीत ३ टक्के वाढ झाल्यामुळे साखरेच्या किमतीने गेल्या ६ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मात्र, किरकोळ बाजारातील ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही.
 
साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे की, देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पीक हंगाम 2023-24 मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ महागणार आहेत.
 
शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील
बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडला नाही तर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. यामुळे ऊस उत्पादनात घट होऊन साखरेचे दर आणखी वाढतील. साखरेच्या दरात वाढ झाल्याने द्वारिकेश शुगर, श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर शुगर आणि दालमिया भारत शुगर या उत्पादकांच्या मार्जिनमध्ये सुधारणा होईल, असे डीलर्सनी सांगितले. त्यामुळे ते शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊ शकतील.