गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (08:04 IST)

डाळीचे भाव कडाडणार

मागील काही दिवसांत नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. किराणा मालाच्या सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यातच डाळीमध्ये असणारी गेल्या वर्षीची तूट यावर्षी अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळीची भाववाढ निश्चित आहे. गेल्या वर्षी ५ लाख टन तूर डाळीची तूट होती. यावर्षी ४ लाखांची तूट असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता भाववाढीवर होऊ शकतो.
 
सलग दुस-या वर्षी डाळींची स्थिती बिकट झाली आहे. पेरणीचा पारंपरिक हंगाम १५ जून ते १५ जुलै संपल्यानंतर ही जुलैअखेरपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. मात्र, असे असताना सध्या देशभरात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरण्यांत ९ टक्क्यांची तूट आहे. यामुळेच प्रामुख्याने तूरडाळीची ५ लाख टनांची तूट असताना त्यात ४ लाख टनांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही स्थिती समोर आली आहे.
 
भारतात दरवर्षी सर्व प्रकारच्या डाळींचे उत्पादन १२० ते १२२ लाख टनांच्या आसपास असते. त्या तुलनेत मागणी १२६ ते १२८ लाख टन असते. उडीद व मूग वगळता उर्वरित डाळींसाठीचे पीक हे फक्त खरिपात घेतले जाते. या डाळी दिवाळीनंतर बाजारात येतात. डाळींच्या एकूण मागणीत सर्वाधिक ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीचा समावेश असतो. या तुलनेत उत्पादनदेखील जवळपास तितकेच असते.
 
डाळींची परिस्थिती
-देशभरातील पेरणी क्षेत्रात ९ टक्के घट
-सर्वाधिक मागणीच्या तुरीची तूट ७ टक्क्यांवर
-पाच लाख टनांच्या तुटीत आणखी 4 लाख टनांची भर
सरकारकडून आयात धोरण…
येत्या काळात डाळीचे भाव वाढत जाणार असल्याने सरकार आता आयात धोरण स्वीकारत आहे. मात्र, जागतिक बाजारातही उत्पादन कमी झाल्याने भाववाढीवर किती नियंत्रण मिळेल, ते सध्या सांगता येत नाही. पण बदललेले पाऊसमान, पीक पद्धती, याचा थेट परिणाम तुरडाळीच्या उत्पन्नावर होत आहे.