शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (08:45 IST)

अदानी समुहात अब्जावधी रुपये गुंतवणारे राजीव जैन कोण आहेत

rajiv jain
कमलेश माथेनी
अमेरिकन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी जीक्यूजी पार्टनर्सची सध्या चर्चा सुरू आहे. या अमेरिकन गुंतवणूक कंपनीने गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहातील चार कंपन्यांमध्ये सुमारे 1.52 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे.
 
अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी साम्राज्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर समूहाला मागच्या एक महिन्यापासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.
 
24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले होते. मात्र अदानी समूहाने हे आरोप फेटाळले.
 
मात्र यानंतरही समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. समूहाच्या बाजारमूल्यात सुमारे 135 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
 
रेटिंग एजन्सी मूडीजच्या आयसीआरए या युनिटने शनिवारी गौतम अदानी समूहाच्या पोर्ट्स आणि एनर्जी बिझनेसचे रेटिंग कमी केलेत. आयसीआरएने अदानी समूहाचे रेटिंग 'स्टेबल' वरून 'निगेटिव्ह' केलेत.
 
पण अदानी समूहासाठी या गुंतवणुकीचे फायदे केवळ आर्थिक स्तरावरच नाहीत तर यामुळे कंपनीच्या प्रतिमेवेही परिणाम दिसून येईल. कंपनीला आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करायचा आहे.
 
हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि कंपनीचं अब्जावधींचं नुकसान झालं.
हिंडेनबर्गने अदानी समूहाला एकूण 88 प्रश्न विचारले होते. हे प्रश्न शेअर्स मध्ये चुकीच्या पद्धतीने फुगवटा आणणे, शेल कंपन्यांच्या माध्यमातून हवाला धंदा आणि ऑडिटिंग वर आधारित होते.
अदानी समूहाने या प्रश्नांवर 413 पानी उत्तर देत आरोप फेटाळून लावले.
भारतातील विरोधी पक्षांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत जेपीसी चौकशीची मागणी केली.
त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली.
अदानींच्या या कंपन्यांमध्ये झाली गुंतवणूक...
जीक्यूजी पार्टनर्सने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत -
 
अदानी एंटरप्रायझेस - 66 कोटी 20 लाख डॉलर्सची गुंतवणूक करून या कंपनीत 3.4 टक्क्यांची भागीदारी मिळवली आहे.
 
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड - 64 कोटी डॉलर्सची (सुमारे 52 अब्ज रुपये) गुंतवणूक करून 4.1 टक्क्यांची भागीदारी मिळवली आहे.
 
अदानी ट्रान्समिशन लिमिटेड - 23 कोटी डॉलर्सची (सुमारे 18 अब्ज रुपये) गुंतवणूक करून 2.5 टक्के भागभांडवल खरेदी केलं.
 
अदानी ग्रीन एनर्जी - 34 कोटी (सुमारे 27 अब्ज रुपये) डॉलर्सची गुंतवणूक करून 3.5 टक्के भागभांडवल खरेदी केलं.
 
हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूहाने पहिल्यांदाच आपल्या गुंतवणुकीची माहिती सार्वजनिक केली आहे.
 
ही माहिती समोर आल्यानंतर शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 17.5 टक्के, अदानी पोर्ट्स 10 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन 5 टक्क्यांनी वाढले.
 
अदानी समूहाचे सीएफओ जुगशिंदर सिंग म्हणाले की, "या गुंतवणुकीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की, अदानी समूहाशी संबंधित कंपन्यांच्या प्रगती, कामगिरी आणि व्यवस्थापनावर जागतिक गुंतवणूकदारांचा आजही विश्वास आहे."
 
कोण आहेत राजीव जैन?
जीक्यूजी पार्टनर्स ही एक इनवेस्टर्स कंपनी आहे जी आपल्या ग्राहकांच्या वतीने बाजारात गुंतवणूक करते.
 
जीक्यूजी पार्टनर्सच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, या कंपनीने 31 डिसेंबर 2022 पर्यंत आपल्या ग्राहकांच्या वतीने 88 अब्ज डॉलर्सची मालमत्ता व्यवस्थापित केली आहे.
 
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये कंपनीचं मुख्यालय आहे. त्याचबरोबर न्यूयॉर्क, लंडन, सिएटल आणि सिडनी या शहरांमध्येही कंपनीची कार्यालये आहेत. या कंपनीत 51 ते 200 कर्मचारी काम करतात.
 
जीक्यूजी पार्टनर्स ही अमेरिकन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे.
या कंपनीने अदानी समूहात सुमारे 1.87 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
राजीव जैन हे जीक्यूजी पार्टनर्सचे चेअरमन आणि चीफ इंवेस्टमेंट ऑफिसर आहेत.
शिवाय ते जीक्यूजी पार्टनर्स स्ट्रेटेजिजच्या सर्वच पोर्टफोलिओचे मॅनेजर देखील आहेत.
 
जीक्यूजी पार्टनर्स ही कंपनी ऑस्ट्रेलियाच्या सिक्युरिटी एक्सचेंजमध्ये लिस्टेड फर्म आहे. या कंपनीने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा आयपीओ लाँच केला होता.
 
राजीव जैन हे जन्माने भारतीय असून त्यांनी अजमेर विद्यापीठातून अकाउंटिंगचा अभ्यास केला आणि त्यातच पदव्युत्तर पदवी घेतल्याचं फोर्ब्स मध्ये म्हटलंय. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मध्ये फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केलं.
 
यानंतर राजीव जैन यांनी स्विस बँक कॉर्पोरेशनमध्ये इंटरनॅशनल इक्विटी एनालिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.
 
राजीव जैन यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, 1994 मध्ये ते व्होंटोबेल अॅसेट मॅनेजमेंटमध्ये मध्ये रुजू झाले. त्यांनी या स्विस कंपनीत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ इंव्हेस्टमेंट ऑफिसर आणि हेड ऑफ इक्विटीज आदी पदांवर काम केलंय.
 
त्यानंतर 23 वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी जून 2016 मध्ये जीक्यूजी पार्टनर्स ही फर्म सुरू केली.
 
जगभरातील 1000 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन ही कंपनीनंकरते. आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक सल्लागार म्हणूनही काम करते.
 
अदानी समूहात गुंतवणूक करण्याबाबत राजीव जैन म्हणाले की, "मला वाटतं या कंपन्यांकडे दीर्घकालीन वाढीची संधी आहे."
 
गौतम अदानी यांचं कौतुक करताना राजीव जैन म्हणाले की, गौतम अदानी त्यांच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून ओळखले जातात.
 
23 फेब्रुवारीला ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत राजीव जैन यांनी अदानी प्रकरणानंतरही भारतीय बँकिंग व्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.
 
या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं की, गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही चीनपेक्षा भारताची स्थिती चांगली असल्याचं सांगता. आता अदानी प्रकरणानंतरही तुमचं हेच मत आहे का?
 
यावर राजीव जैन म्हणाले होते की, "माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर काहीच बदललेलं नाही. अदानी प्रकरणात अनेक मुद्दे आहेत. यातलं पहिलं म्हणजे बँकिंग सिस्टीम चांगली आहे. दुसरं म्हणजे, या नियमन केलेल्या मालमत्ता आहेत. सिस्टीमनुसार आपल्याला काहीच चिंता करण्याचं कारण नाहीये, अदानी हे एक वेगळं प्रकरण आहे."
 
गुंतवणुकीबद्दल प्रश्न उपस्थित..
जीक्यूजीने केलेल्या गुंतवणुकीबाबत त्यांच्याच एका क्लायंटने प्रश्न उपस्थित केलाय.
 
जीक्यूजी क्लायंटच्या ऑस्ट्रेलियन पेन्शन फंडाने या गुंतवणुकीबाबत प्रश्न उपस्थित केलेत. जीक्यूजीने ऑस्ट्रेलियातील किमान चार सर्वात मोठ्या पेन्शन फंडांच्या वतीने पैसे उभे केलेत.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जीक्यूजी पार्टनर्सचे चेअरमन आणि चीफ इंव्हेस्टमेंट ऑफिसर राजीव जैन यांनी उत्तरात म्हटलंय की, कंपनीने अदानी समूहाचा सखोल अभ्यास केला असून हिंडेनबर्गच्या रिपोर्टशी आम्ही सहमत नाहीये.
 
जीक्यूजी कव्हर करणारे मॉर्निंगस्टारचे विश्लेषक शॉन लीर यांनी रॉयटर्सला सांगितलं की, "राजीव जैन यांच्या निर्णयामुळे काही लोक जीक्यूजी मध्ये गुंतवणूक करणं थांबवतील पण कंपनीचा वाढता आलेख पाहता काहीजण गुंतवणूक करण्यास इच्छुकही असतील."
 
अदानी समूहाला सोवेरन वेल्थ फंडातून तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळाल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टस मध्ये करण्यात आला होता. अदानी समूहाने नियामक संस्थांना दिलेल्या माहितीत या मीडिया रिपोर्ट्सचंही खंडन केलंय.
 
अदानी समूहाने म्हटलंय की, या निव्वळ अफवा असून त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही.
 
आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन
हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.
 
समितीच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे असून ही समिती येत्या दोन महिन्यांत आपला तपास अहवाल न्यायालयाला सादर करेल.
 
या समितीत न्यायमूर्ती जेपी देवधर, बँकर के व्ही कामथ, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी, एसबीआयचे माजी अध्यक्ष ओपी भट्ट आणि सुरक्षा कायदा तज्ञ सोमशेखर सुंदरेशन यांचा समावेश आहे.