मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मे 2018 (16:03 IST)

'बबन' ने साजरी केली सुपरहिट नॉनस्टॉप ५० ची सक्सेसपार्टी

'कस्सं?...बबन म्हणेन तसं' आणि 'हम खडे तो साला सरकार से भी बडे' हा बबनचा डायलॉग असो वा सिनेमातील खलनायक विक्रमदादाचा 'म्हणजे आम्ही येडे' हा संवाद असो, आजही 'बबन' सिनेमा महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहात आवडीने पाहिला जात आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित ग्रामीण युवकावर आधारित असलेल्या या सिनेमाला पश्चिम महाराष्ट्राने तर अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे ! राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित या सिनेमाने सुपरहिट ५० दिवस पूर्ण केले असल्यामुळे, 'बबन' च्या या घवघवीत यशाची नुकतीच मुंबई येथे सक्सेसपार्टी साजरी झाली. या सक्सेसपार्टीत 'बबन' सिनेमातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.
'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. त्यादिवसांपासून आजतागायत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटीची रग्गड कमाई केली आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील काही सिनेमागृहात आजही 'बबन' मोठ्या आवडीने पाहिला जात आहे. ख्वाडा फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव या सिनेमातल्या प्रमुख कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे. सामान्य कथा आणि सामान्य चेहऱ्यांना घेऊन मोठ्या पडद्यावर सादर झालेल्या या सिनेमाचे यश नक्कीच असामान्य आहे. त्यामुळे नाबाद ५० दिवस पूर्ण करणाऱ्या 'बबन' ने जर सुपरहिट १०० दिवसांवर कूच केली, तर काही वावगे ठरणार नाही !