रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (11:56 IST)

छत्रपती संभाजी' २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

chatrapati sambhaji movie
छत्रपती संभाजी महाराजांच्या  पराक्रमाला  आणि  बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही  संकटाला  निर्भीडपणे सामोरे  जात  पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्याविस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा  राकेश सुबेसिंह  दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित  ‘छत्रपती  संभाजी’ हा  चित्रपट  येत्या २  फेब्रुवारीला  चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.  ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा  चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.  
 
राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले  छत्रपती संभाजी महाराज  रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी  करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला  प्रेरणादायी इतिहास  'छत्रपती  संभाजी' या चित्रपटातून  तरुण पिढीला पाहता येणार आहे. राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या  जोरावर  छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.  प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी'  चित्रपटात आहेत. 
 
चित्रपटाला साजेशी  ६ गाणी  चित्रपटात असून अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत. 
 
'छत्रपती संभाजी' चित्रपट २ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.