शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (16:19 IST)

येतोय...! पहिला मराठी भव्य ॲक्शनपट....बकाल !!

ॲक्शन फिल्म्सचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चित्रपटांमध्ये ॲक्शन सीन्स फारच कल्पकतेने रचलेले आणि तांत्रिकदृष्ट्या परिणामकारक चित्रीत केले जातात. स्टंट्स आणि ॲक्शन पाहण्याचा आनंद मोठ्यापडद्यावर अधिक मिळत असल्याने सिनेरसिक असे चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून सिनेमागृहात जातात. परंतु, थरारक ॲक्शन सीन्स शूट करणे हे मोठ्या खर्चाचे आणि वेळखाऊ काम असल्याने मराठी चित्रपटांमध्ये ॲक्शन  बेतानेच पाहायला मिळते. पण, मराठीतही एक भव्य थरारक ॲक्शनपट येतोय. समीर मुकुंद आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेन्डा निर्मित ‘बकाल’ हा पहिला मराठी भव्य ॲक्शनपट येत्या ८ नोव्हेबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  
 
ऐंशी-नव्वदच्या दशकात विदर्भातील तरुणांना गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यात जखडून ठेवणाऱ्या ‘बकाल’ नावाच्या एका विखारी, अदृश्य यंत्रणेने अक्षरश: धुमाकुळ घातला होता. ह्या यंत्रणेचा म्होरक्या ना कधी जगासमोर आला ना सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला. अशा ‘बकाल’ नावाच्या घातक शक्तीला एका समांतर सुरक्षा संघटनेच्या युवकांनी मोठ्या शिताफीने आश्चर्यकारकरित्या उध्वस्त केले. ह्या सत्यघटनेच्या आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ‘मारबत’ परंपरेच्या मूळ उद्देशाच्या आधारावर ‘बकाल’ बेतलेला आहे.
 
 ‘बकाल’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला निर्भिडपणे स्वत:  स्टंट्स करणारा एक नवा ॲक्शन-डान्सिंग स्टार गवसला आहे. लहानपणापासून उत्तम नर्तक आणि साहसीखेळ प्रकारात स्वअध्ययनाने प्राविण्य मिळविलेला मुंबईचा चैतन्य मेस्त्री चित्रपटाचा नायक आहे. बकालमधील जवळपास सर्व स्टंट्स आणि ॲक्शन सीन्स त्याने स्वत: केलेल्या आहेत. त्याच बरोबर झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक – छोटे चॅम्पियन्स’ ह्या डान्सींग रीॲलिटी कार्यक्रमाची आणि मटा श्रावणक्वीन-२०१७ ची उपविजेती जुई बेंडखळे ह्या नवोदित अभिनेत्रीने मुख्य नायिका साकारली आहे. अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक आदी मातब्बर कलावंतांचा अभिनय ‘बकाल’ ह्या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
अडीचशेहून अधिक चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केलेले सुप्रसिद्ध कॅमेरामन समीर आठल्ये यांचे दिग्दर्शन, विनोद देशपांडे यांचे कथाबीज, मिलिंद सावे यांचे पटकथा आणि स्पेशल इफेक्ट्स, अभिराम भडकमकर यांचे संवाद, फाईट मास्टर अंदलीब पठाण यांच्या ॲक्शन्स, दिलीप आणि दीपा मेस्त्री यांचे नृत्य दिग्दर्शनाने बहरलेल्या बकाल चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी त्यांच्या शैलीच्या पलिकडे जाऊन संगीतसाज चढविला आहे.