शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (09:09 IST)

ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी निधन

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी (८३) यांचे गुरुवारी ठाण्यात निधन झाले.  गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यामागे पत्नी, ३ मुली, नातवंड असा परिवार आहे.
 
लिलाधर कांबळी हे अस्सल मालवणी संवादफेक आणि अभिनयातील धीरगंभीर विनोद म्हणून ओळखले जात. मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरणमध्ये त्यांनी काम केले होते. मालवणी फेम ‘केला तुका आणि झाला माका’या नाटकातही त्यांनी मोठी भूमिका केली होती. मात्र दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेले हसवा फसवीतील त्यांची भूमिका नाट्यरसिकांच्या दिर्घकाळ स्मरणात राहिली. 
 
हिमालयाची सावली, कस्तूरी मृग, राम तुझी सीमा माऊली, लेकुरे उदंड झाली, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, शॉर्टकट, दुभंग, अशी ३० हून अधिक नाटकात त्यांनी काम केलं आहे. वात्रट मेले नाटकातील पेडणेकर मामा, केला तुका नी झाला माका मधील आप्पा मास्तर, वस्त्रहरण जोशी मास्तर, या भूमिका प्रचंड गाजल्या. कांबळी यांच्या अभिनय कारकिर्दीतील ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’हे एक महत्त्वाचे नाटक. या नाटकाने त्यांना अमराठी प्रेक्षकही ओळखायला लागले. कारण हे नाटक इंग्रजी होते. यात त्यांची ‘डिकास्टा’ही गॅरेज मालकाची भूमिका होती.  या नाटकाचे दोनशे प्रयोग त्यांनी केले.
 
नाटकाबरोबरच वस्त्रहरण, हसवाफसवी या नाटकाने त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली. भाकरी आणि फूल, गोट्या, बे दुणे तीन, कथास्तु, हसवणूक, कॉमेडी डॉट कॉम, चला बनू रोडपती, गंगूबाई नॉनमॅट्रीक, या मालिकांमध्येही त्यांनी कामं केली. ‘पडदा उघडण्यापूर्वी’हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र (शब्दांकन-महेंद्र कुरघोडे) ‘रूपरंग’प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.