शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 7 मार्च 2020 (12:29 IST)

मी सिनेसृष्टीत जातीयवाद अनुभवलेला नाही

ब्राह्मण कलाकारांबद्दल दिग्दर्शक सुजय डहाकेने केलेल्या वक्तव्यानंतर कलाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. तर ब्राह्मण महासंघानेदेखील सुजयच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. याविषयी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीदेखील त्यांचे मत व्यक्त केले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कलाविश्वात जातीयवाद आताचा नाही, फार वर्षांपासून या जातीयवादाला सुरुवात झाली आहे. इतकेच नाही तर त्यासाठी काही ठरलेली माणसे कार्यरत आहेत. ही खरेच चिंतेची बाब आहे. मात्र, आपण काहीच करु शकत नाही, असे विक्रम गोखले म्हणाले.
 
जातीयवादाचा अनुभव आला का? कलाविश्वात कार्यरत असताना तुम्हाला कधी जातीयवादाचा अनुभव आला का? असा प्रश्नही गोखले यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देत, सिनेसृष्टीमध्ये मी कधीही जातीयवाद अनुभवला नाही किंबहुना माझ्या सहकार्‍यांसोबतही असे झाल्याचे माझ्या लक्षात नाही, असे गोखले यांनी सांगितले.  गोखले लवकरच 'एबी आणि सीडी' या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे मराठीतील ज्येष्ठ अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशहा अशा दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले पहिल्यांदाच आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.