लता मंगेशकर यांना आदरांजली: भारताचा आवाज हरपला
ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दात व्यक्त केला आहे.
"लतादीदींचं जाणं शब्दातीत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं. चित्रपटांच्या पल्याड, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"देशाची शान आणि संगीत जगताच्या शिरोमणी स्वरकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन अतिशय दु:खद आहे. पुण्यात्माला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं जाणं देशाची अपरिमित हानी आहे. संगीत साधकांसाठी त्या सदैव प्रेरणास्थान राहतील" असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
"पिढ्यानपिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो. लता मंगशेकर जगातलं सातवं आश्चर्य. 70व्या वर्षी दिलेला आवाज 22 वर्षाच्या तरुणीचा वाटत असे. आमचा आधार गेला", असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
"भारताचा आवाज हरपला, संगीत अमर रहे. ओम शांती", अशा शब्दांत गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
युग संपलं, एक सूर्य, एक चंद्र, एकच लता अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"गहिरं दु:ख. भारताचा मानबिंदू असलेल्या लतादीदी आपल्यात नाहीत. तुम्ही गायलेली गाणी, आठवणी सदैव स्मरणात राहतील. तुम्ही आमच्यासाठी अभिमानास्पद राहाल", असं क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटलं आहे.