शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (23:00 IST)

विशाखा सुभेदारची हास्यजत्रेतून 'एक्झिट' कारण...

छोट्या पडद्यावर गेली अनेक वर्षं महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारने विनोदाच्या सुपरहिट फॉरमॅटमधून ब्रेक घेण्याचं ठरवलंय. पण असा निर्णय तिने का घेतला?
 
सध्या विशाखा सुभेदार 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटते.
 
या कार्यक्रमानेच नाही तर यातल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केलीये.
 
त्यातच विशाखा आणि समीर चौगुले म्हणजे हास्य जत्रा या मालिकेतली भन्नाट जोडी. या दोघांनी आतापर्यंत आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना वेड लावलंय. पण हे चित्र लवकरच बदलणार आहे.
 
विशाखा सुभेदारनं एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिलीये. ती आपल्या पोस्टमध्ये लिहिते...
 
'एक निर्णय...... अनेक वर्षं स्किट फॉरमॅटमध्ये काम करतेय.. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..!
 
2011च्या पहिल्या पर्वाची विजेती जोडी, मांगले आणि मी... आणि आज 2022 समीर आणि विशाखा.... हा प्रवास खरंच सोपा नाहीय... मी काही फार ग्रेट विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल याचा शोध घेणे किंवा जे लेखकानं लिहिलंय ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिकपणे केलंय. माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही कामं कशी फुलतील याचा विचार करत, त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्युनिंग, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं... दर आठवड्याला मिळणाऱ्या स्किटमधील प्रत्येक भुमिकेची 15 मिनिट गेली 10 वर्षं मी जगलेय..! माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे...! त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखले गेले. दरवेळी स्किट झाल्यानंतर किंवा होण्याआधीचं टेंशन भयानक असतं. कालपेक्षा चांगल करायचंय, त्या टेन्शनमधून काहीकाळ बाहेर पडतेय.' असं म्हणत तिने आपला निर्णय चाहत्यांना सांगितलाय.
 
आता विशाखा पुढे काय करणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याआधीच तिनं याचं उत्तर आपल्या पोस्टमध्येच लिहिलंय.
 
ती या पुढे छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती सिनेमातील 20/25 दिवसांचा प्रवास, किंवा 500-1000 प्रयोगाचं नाटक किंवा सिरीयल या वाटेवरचा प्रवास सुरु करणारे.
 
विशाखानं अनेक मराठी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ज्यात सासूचा स्वयमवर, 66 सदाशिव, येरे येरे पावसा, येरे येरे पावसा 2, अरे आवाज कुणाचा, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, बालक पालक, फक्त लढ म्हणा अशा हटके सिनेमांचा समावेश आहे.
 
विशाखाच्या या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसंच आता तिला नव्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुकही आहेत.