शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (11:40 IST)

सकारात्मक ऊर्जेसाठी योगा उत्तम - अमृता खानविलकर

सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर एकमेव उपाय म्हणजे योगा. योगा हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय असून मनःशुद्धीसाठीही अतिशय उत्तम औषध आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरणाऱ्या या योगाचे महत्त्व आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. या महामारीच्या काळात अनेक जण योगाभ्यास करून मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आपले सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकरनेही सोशल मीडियावर योगाचे फोटोज शेअर करत, आजच्या काळात योगा किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या फॉलोअर्सना योगा करण्यासाठी प्रेरित केले आहे. 
आपल्या या योगाभ्यासाबद्दल अमृता खानविलकर म्हणते,''सध्या आजूबाजूचे वातावरण खूपच भयंकर आहे. त्यामुळे अनेकदा नैराश्यही येते. इतकी वर्षं या क्षेत्रात असल्याने शूटिंगच्या, मीटिंग्सच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत होत्या. मित्रमैत्रिणींना भेटणं होतं असे आणि अचानक माणसांचं भेटणं बंद झाल्याने, कुठेतरी मेंटल ब्लॉक झाला आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत असतानाच पडद्यामागे आम्हीही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगत असतो आणि त्यावेळी आम्हालाही कुठेतरी नैराश्य, तणाव येतोच आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मी सध्या योगाला प्राधान्य देत आहे आणि याचा मला खूपच फायदा होत आहे. त्यामुळेच मी तुम्हालाही हेच सांगेन, की दिवसातला काही वेळ तुम्हीही योगासाठी द्या. या तणावपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपाय आहे.''