गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गॉल , शनिवार, 29 जुलै 2017 (16:57 IST)

भारताचा श्रीलंकेवर पहिल्या कसोटीत 304 धावांनी विजय

कर्णधार विराट कोहलीच्या 17व्या टेस्ट शतकामुळे भारताने श्रीलंकेला 550 धावांचे लक्ष्य दिले होते. उत्तरात श्रीलंका संघ मात्र 245 धावांवर आउट झाला आणि कसोटी सामना भारताने जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली. दुस-या डावात श्रीलंकेकडून सलामीवीर करुणारत्ने (97), डिकवेला (67) आणि मेंडीस(36) या तिघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. 
 
दुस-या डावात श्रीलंकेकडून करुणारत्ने आणि मेंडीसमध्ये तिस-या विकेटसाठी 79 आणि पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली. या दोन भागीदा-यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज खेळपट्टीवर फक्त हजेरीवीर ठरले. मोक्याच्या क्षणी रविचंद्रन अश्विनने काढलेल्या तीन विकेटसमुळे श्रीलंकेची  घसरगुंडी उडाली.  एकाबाजूने दमदार फलंदाजी करणा-या करुणारत्नेचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. करुणारत्नेला (97) धावांवर अश्विनने क्लीनबोल्ड केले. 
 
त्यानंतर (67) धावांची अर्धशतकी खेळी करणा-या डिकवेलाला अश्विनने सहाकरवी झेलबाद केले. नुआन प्रदीपला  भोपळाही फोडू न देता अश्विनने माघारी धाडले. भारताकडून अश्विन-जाडेजाने प्रत्येकी तीन-तीन तर, उमेश यादव-शामीने प्रत्येक एक गडी बाद केला. 
 
श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली होती.  थरंगाला मोहम्मद शामीने (10) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यापाठोपाठ गुणाथिलकाला (2) धावांवर उमेश यादवने पूजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर मेंडीस आणि करुणारत्ने यांनी तिस-या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करुन डावाला स्थैर्य मिळवून दिले. मेंडीसला (36) धावांवर जाडेजाने सहाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मॅथ्यूजला (2) जाडेजाने लगेचच माघारी धाडले. कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकानंतर भारताने आपला दुसरा डाव तीन बाद 240 धावांवर घोषित केला. 
 
भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 550 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात भारताकडे 309 धावांची आघाडी होती. विराट कोहलीचे नाबाद शतक (103) चौथ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्टय ठरले. कर्णधार कोहलीच टेस्ट क्रिकेटमधील हे 17 वे शतक आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात भारताने एकही विकेट गमावली नाही. अजिंक्य रहाणेने नाबाद (23) धावा केल्या. पहिल्या डावात अजिंक्यने अर्धशतक झळकवले होते. 
 
सलामीवीर शिखर धवनच्या (190) धावा आणि चेतेश्वर पूजाराची (153) दीडशतकी खेळी याच्या बळावर भारताने पहिल्या डावात 600 धावा केल्या होत्या. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पहिला डाव 291 धावांवर आटोपल्यामुळे भारताला मोठी आघाडी घेता आली. तिस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दुस-या डावात भारताच्या ३ बाद १८९ धावा होत्या. सलामीवीर अभिनव मुकंदने ८१ धावांचे योगदान दिले. दिवसाच्या अखरेच्या षटकात तो पायचित झाला. कोहली आणि मुकुंदने तिस-या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली.
 
त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज फार काही तग धरू शकले नाहीत. रवींद्र जडेजाने उपहारानंतर लगेच लाहिरु कुमाराला बाद करीत लंकेचा पहिला डाव संपुष्टात आणला. दिलरुवान परेरा सर्वाधिक ९२ धावांवर नाबाद राहिला. अँजेला मॅथ्यूजनेदेखील ८३ धावांचे भरीव योगदान दिले. श्रीलंकेला फॉलोऑन न देता दुस-या डावात परत फलंदाजी करण्याचा निर्णय घेणा-या भारताची सुरुवात अडखळत झाली. 
 
गेल्या ७८ वर्षांत लक्ष्याचा पाठलाग करताना कुठल्याही संघाने चौथ्या डावांत ४५१ पेक्षा अधिक धावा केलेल्या नाहीत. कर्णधार म्हणून कोहलीने विदेशात सर्वांत कमी १७ डावांत एक हजार धावा काढण्याचा भारतीय विक्रम नोंदविला. हार्दिक पांड्याने पहिल्या डावात नुवान प्रदीपची दांडी गूल करीत कसोटीतील पहिल्या बळीची नोंद केली.