1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , शनिवार, 14 डिसेंबर 2019 (13:09 IST)

आयपीएलच्या लिलावासाठी 332 खेळाडूंची यादी तयार

List of 332 players ready for IPL auction
आयपीएल 2020 च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे दुपारी 2.30 वाजता लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी सुरुवातीला एकूण 971 खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. त्या यादीत 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू होते. त्यानंतर आता 332खेळाडूंची नावे अंतिम करण्यात आली असून त्यात टीम इंडियाकडून खेळलेले 19 खेळाडू आहेत. याशिवाय मूळ यादीत नसलेला विंडीजचा केसरिक विलियम्स, बांगलादेशचा मश्फिकूर रहीम, ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अ‍ॅडम झम्पा, इंग्लंडचा 21 वर्षीय विल जॅक्स यासारख्या 24 नवोदित खेळाडूंची नावेदेखील अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहे. या लिलाव प्रक्रियेचे काम ह्यू एडमीड्‌स पाहणार आहेत.
 
आयपीएल 2020 ची लिलाव प्रक्रिया ही केवळ एक दिवस असणार आहे. या प्रक्रियेदरम्यान आठ संघांना आपला चमू पूर्ण करण्यासाठी एकूण 73 खेळाडू हवे आहेत. त्यापैकी 29 खेळाडू हे परदेशी असणार आहेत. अंतिम यादीत भारताचा रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट यांसारख्या खेळाडूंना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिाचा धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलदेखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. मानसिक ताणामुळे तो क्रिकेटपासून काही काळ दूर होता. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलिाचा पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिचेल मार्श, आफ्रिकेचा डेल स्टेन, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांनादेखील अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.