इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटला आऊट करत 500व्या विकेटची नोंद केली. टेस्ट क्रिकेटमध्ये 500 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स पटकावणारा ब्रॉड इंग्लंडचा दुसरा तर एकूण सातवा बॉलर ठरला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, भारताचा अनिल कुंबळे, इंग्लंडचा जेम्स अँडरसन, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा, वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श यांनी 500 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया केली आहे.
				  				  
	 
	फास्ट बॉलरना दुखापतींचं ग्रहण असतं. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं व्यग्र वेळापत्रक, तीन फॉरमॅटसह जगभरात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळणं यामुळे फास्ट बॉलर्सची कारकीर्द आक्रसत चालली आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	हॉलीवूड नायकाला शोभेल असा चेहरा, ब्राऊन रंगाचे भुरभरणारे केस, निसर्गाची वरदान लाभलेली उंची यामुळे स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडच्या भात्यातलं अस्त्र झाला नसता तरच नवल.
				  																								
											
									  
	 
	मायदेशात ढगाळ वातावरणात बॉल स्विंग करून भल्याभल्या बॅट्समनला अडचणीत टाकणं ही ब्रॉडची खासियत. बॉलिंगच्या बरोबरीने उपयुक्त बॉलिंग आणि उत्तम फिल्डिंग करत असल्याने ब्रॉड संघात असणं हे इंग्लंडसाठी सर्वसमावेशक पॅकेजप्रमाणे आहे.
				  																	
									  
	 
	पाचशे विकेट्सच्या दुर्मीळ विक्रमासह ब्रॉडने महान गोलंदाजांच्या मांदियाळीत स्थान पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवळी ब्रॉड आणि टीम इंडिया यांचं नातं राहिलं आहे. याच ऋणानुबंधाचा घेतलेला आढावा.
				  																	
									  
	 
	सहा बॉलमध्ये सहा सिक्सेस खाणारा बॉलर
	पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया आणि इंग्लंडचा मुकाबला होता. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला.
				  
				  
	स्टुअर्ट ब्रॉडने मॅचची दुसरी ओव्हर टाकली. यामध्ये फक्त 4 रन्स दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 12 रन्स दिल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 8 रन्स दिल्या. तीन ओव्हरनंतर स्टुअर्ट ब्रॉडचे आकडे होते 3-0-24-0. विकेट मिळाली नसली तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटचा विचार करता हे आकडे वाईट नक्कीच नव्हते.
				  																	
									  
	 
	अठरावी ओव्हर अँड्यू फ्लिनटॉफने टाकली. अंपायरकडून कॅप घेऊन फिल्डिंगला जाता जाता फ्लिनटॉफ आणि युवराज यांच्यात वादावादी झाली. अंपायर्सनी प्रकरण वाढणार नाही याची काळजी घेतली. युवराजला धोनीने शांत केलं.
				  																	
									  
	 
	फ्लिनटॉफ फिल्डिंगसाठी बाऊंड्रीच्या दिशेने रवाना झाला. भांडण फ्लिनटॉफ आणि युवराजमध्ये झालं. मात्र युवराजच्या रागाचा फटका स्टुअर्ट ब्रॉडला बसला.
				  																	
									  
	 
	19व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर युवराजने बॉल मिडविकेटच्या पट्ट्यात पिटाळला. दुसरा बॉल लेगस्टंपवर होता. युवराजने फ्लिक करताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने फेकून दिला. तिसऱ्या बॉलवर युवराजने बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार खेचला.
				  																	
									  
	 
	चौथा बॉल ब्रॉडने राऊंड द विकेट टाकला. ब्रॉडच्या हातून बॉल निसटला आणि फुलटॉसवर युवराजने पॉइंटच्या पटट्यात षटकार लगावला. चार बॉलमध्ये चार सिक्स बसल्याने इंग्लंडचा कॅप्टन, ब्रॉड यांच्यात मीटिंग झाली.
				  																	
									  
	 
	पाचव्या बॉलवर ब्रॉडने वेग काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल फुटबॉलसारखा दिसू लागलेल्या युवराजने डावा पाय क्रीझमध्ये रोवून मिडविकेटच्या दिशेने अफलातून षटकाराची नोंद केली.
				  																	
									  
	 
	असहाय्य आणि हतबल झालेल्या ब्रॉडने जेवढे खेळाडू बाऊंड्रीच्या इथे ठेवता येतील तेवढे ठेवले. सहा बॉलमध्ये सहा सिक्सेसचा अविश्वनीय विक्रम युवराजच्या दृष्टिक्षेपात आला होता.
				  																	
									  
	 
	एका ओव्हरमध्ये युवराजने मॅचचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव नसला तरी ब्रॉड सोम्यागोम्या बॉलर नव्हता. इंग्लंडचा प्रमुख बॉलर ही जबाबदारी असलेल्या बॉलरने एका ओव्हरमध्ये सहा षटकार खाणं त्याच्या प्रतिष्ठेला तडा देणारं होतं.
				  																	
									  
	 
	सहाव्या बॉलवर सिक्स बसू नये म्हणून ब्रॉडने सर्वतोपरी तयारी केली मात्र भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या युवराजने सहावा बॉल मिडऑनच्या डोक्यावरून प्रेक्षकात टोलवला. हा बॉल बाऊंड्रीबाहेर जातोय हे पाहताच मैदानातल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
				  																	
									  
	 
	युवराजने 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्सेस लगावणारा युवराज केवळ दुसरा बॅट्समन ठरला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने नेदरलँड्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
				  																	
									  
	 
	परंतु नेदरलँड्स हा लिंबूटिंबू संघ होता. एका ओव्हरमध्ये सहा षटकार बसल्याने स्टुअर्ट ब्रॉडचे आकडे झाले 4-0-60-0. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 218 रन्सचा डोंगर उभारला. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 200 रन्स करत चांगलं प्रत्युत्तर दिलं. परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
				  																	
									  
	 
	युवराजने इंग्लंड आणि ब्रॉड यांच्या प्रतिष्ठेला दणका दिला. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच असा मार खावा लागल्यानंतर मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होण्याची शक्यता असतं. परंतु ब्रॉड खचला नाही. त्याने आपली गुणकौशल्यं वेळोवेळी घासूनपुसून लख्ख केली. आपल्या बॉलिंगमधल्या उणीवा दूर करत सर्वोत्तमाचा ध्यास घेतला. सहा बॉलमध्ये सहा षटकार हा आघात समर्थपणे पेलत ब्रॉडने कणखरता सिद्ध केली.
				  
				  
	'त्या बाऊन्सरने आजही झोप उडते'
	2014 मध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. मँचेस्टर इथं झालेल्या टेस्टमध्ये वरुण आरोनने 141.8 ताशी वेगाने टाकलेल्या बॉलवर स्टुअर्ट ब्रॉडने पूल करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसला आणि ब्रॉडच्या हेल्मेटवर जाऊन आदळला.
				  																	
									  
	 
	हेल्मेटचा मुख्य भाग आणि ग्रिल यांच्या दरम्यानच्या भागावर जाऊन आदळला. अतिशय जोरात आदळलेल्या या बॉलने स्टुअर्ट ब्रॉडच्या नाकातून रक्त वाहू लागलं. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ब्रॉडच्या मदतीसाठी धाव घेतली. इंग्लंडच्या फिजिओंनी ब्रॉडला तपासलं. बराच रक्तस्राव झाला होता परंतु ब्रॉडची प्रकृती ठीक होती. अधिक उपचार आणि आराम करण्यासाठी ब्रॉडने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला.
				  																	
									  
	 
	ब्रॉडला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आरोनच्या बाऊन्सरने ब्रॉडच्या नाकाचं हाड तुटल्याचं स्पष्ट झालं. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या दोन डोळ्यांनाही मार लागला. बाऊन्सरच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी त्याला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली.
				  																	
									  
	 
	'बॉल येऊन आदळेल अशी भीती माझ्या मनात येते. मला मधूनच त्या आठवणी त्रास देतात. मी थकलेलो असताना बॉल माझ्या दिशेने येत आहेत असा भास होतो', असं ब्रॉडने तेव्हा सांगितलं होतं.
				  																	
									  
	 
	मुख्य बॉलर या जबाबदारीबरोबरच ब्रॉड आठव्या क्रमांकावर येऊन उपयुक्त बॅटिंग करत असे. आरोनच्या बाऊन्सर आक्रमणानंतर ब्रॉडच्या बॅटिंगवर परिणाम झालं. त्याच्या बॅटिंगमधलं सातत्य हरपलं. मोठी खेळी करण्यात त्याला अपयश येऊ लागलं.
				  																	
									  
	 
	योगायोग म्हणजे ज्या टेस्टमध्ये ब्रॉडच्या नाकावर बाऊन्सर आदळला त्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. प्रेझेंटेशन सेरेमनीवेळी ब्रॉड हॉस्पिटलमध्ये होता.
				  																	
									  
	 
	पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाचा डाव 152 धावातच आटोपला. ब्रॉडने सहा विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 367 धावांची मजल मारली.
				  																	
									  
	 
	दुसऱ्या डावातही टीम इंडियाची भंबेरी उडाली आणि दुसरा डाव 161 धावातच आटोपला. ब्रॉड दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगला आला नाही. इंग्लंडने एक डाव आणि 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
				  																	
									  
	 
	या प्रसंगानंतर वरुण आरोन आणखी फक्त 7 टेस्ट खेळला. परंतु ब्रॉडने इंग्लंडचा प्रमुख फास्ट बॉलर ही भूमिका दहाहून अधिक वर्ष समर्थपणे पेलली.
				  																	
									  
	 
	दादाशी पंगा पडला महागात
	2007 मध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. सात मॅचच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया 2-3 अशी पिछाडीवर पडली होती. सहाव्या मॅचमध्ये इंग्लंडने तीनशेपल्याड धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान पेलताना सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही दिग्गजांची जोडी खेळत होती.
				  																	
									  
	 
	वय, अनुभव आणि कर्तृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर नवखा असणाऱ्या ब्रॉडने गांगुलीला उकसवण्याचा प्रयत्न केला. मात्र अरे ला का रे करण्यासाठी प्रसिद्ध दादाने ब्रॉडला तू अजून बच्चा आहेस, तसाच वाग असं सुनावलं.
				  																	
									  
	 
	गांगुली-ब्रॉड वादावादीवेळी अंपायर यांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं. गांगुलीने ब्रॉडच्या बॉलिंगवर आक्रमण करत त्याला निष्प्रभ केलं. दोन ओव्हरनंतर ब्रॉडची बॉलिंग बंद करण्यात आली.
				  																	
									  
	 
	बाबांसमक्ष विक्रम
	स्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड हे क्रिकेटपटू होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते आयसीसीचे मॅचरेफरी झाले. आयसीसीच्या नियमानुसार, ज्या दोन देशांची मॅच असते त्या देशाचे अंपायर आणि मॅचरेफरी नसतात. तटस्थ देशांचे असतात.
				  																	
									  
	 
	यामुळे स्टुअर्ट ब्रॉड जेव्हा खेळतो तेव्हा त्याचे वडील ख्रिस मॅचरेफरी असू शकत नाहीत. परंतु कोरोना काळात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
				  																	
									  
	 
	स्टुअर्ट ब्रॉड वडील ख्रिस ब्रॉड आणि आजोबांसमवेत
	 
	आयसीसीने परिस्थिती ओळखून सध्या सुरू असलेल्या इंग्लंड-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिजसाठी नियमांमध्ये बदल केले. इंग्लंडमध्ये ही सीरिज होते आहे आणि तरीही इंग्लंडचे अंपायर्स आणि मॅचरेफरी या सामन्यात कार्यरत आहेत.
				  																	
									  
	 
	स्टुअर्टचे वडील ख्रिस ब्रॉड या सीरिजसाठी मॅचरेफरी आहेत. आयसीसीच्या नियमांमुळे 139 टेस्ट खेळताना स्टुअर्टच्या नशिबी जे नव्हतं ते एका खासक्षणी आहे. वडील मॅचरेफरी असताना मुलगा स्टुअर्टने 500 विकेट्सची नोंद केली आहे.