गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

रेल्वेतही करता येणार शाही विवाह

प्रत्येकाच्या आयुष्यातील विवाह सोहळा हा अविस्मरणीयच असतो, परंतु तुमच्या विवाह सोहळ्याला आणखी अविस्मरणीय बनवण्याची संधी भारतीय रेल्वे तुम्हाला देत आहे. 
 

वेडिंग ऑन व्हिल्स या संकल्पनेसह महाराजा एक्स्प्रेसमधून शाही विवाह सोहळा पार पाडता येणार आहे. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत हा विवाह सोहळा पार पाडता येणार आहे. परंतु, असे लग्न करण्यासाठी तुमची कोटय़वधी रूपये खर्च करण्याची तयारी असावी लागणार आहे.
 
भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा विचार करून अशा राजेशाही लग्न सोहळ्यासाठी ही खास ऑफर सुरू केली आहे. परंतु, त्यासाठी तुम्हाला साडेपाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. जर एवढे पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असेल, तर आठ दिवसांचा हा प्रवास खास तुमच्यासाठी खास ठरू शकणार आहे. 
 
आयआरसीटीसीने वधू-वर आणि वर्‍हाडींसाठी हा सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी चंग बांधला आहे. महाराजा एक्स्प्रेसमध्ये 88 प्रवाशांसाठी आठ दिवसांचे लक्झरी वेडिंग पॅकेज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
 
मुंबई ते दिल्ली हा प्रवासाचा मार्ग असेल. या प्रवासात अजंठा, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जयपूर, रणथंबोर, ग्वाल्हेर, लखनौ, वाराणसी, खजुराहो आणि आग्रा यांचा समावेश असेल.

ट्रेनला 24 कोच असून त्यात 43 गेस्ट केबिन्स आहेत. यापैकी 20 डिलक्स, 18 ज्युनिअर ट्स्, चार सुट्स आणि एका प्रेसिडेंशियल सुटचा समावेश आहे. प्रत्येक सुटची किंमत 6 हजार 840 डॉलर्स (अंदाजे साडेचार लाख रुपये) पासून 23 हजार 700 डॉलर्स (अंदाजे 15.8 लाख रुपये) या घरात आहे.