शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By

शिक्षक दिन अर्थात चिंतनाचा दिन

समाज व शिक्षक यांचे नाते अतूट आहे. तसेच ते अमूल्ही आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील परंपरेमध्ये समाजऋण
फेडण्यासाठीचाही उल्लेख आढळतो. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. राष्ट्राची ध्येय-धोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे आखली जातात त्याची रूजवणं करणारा, ती मूल्ये वृध्दिंगत होण्यासाठी संस्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. राष्ट्रउभारणीत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. अशावेळी एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो. समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात. या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना राष्ट्रीय चारित्र्यही घडणे अभिप्रेत असते. महात्मा गांधीजींना शिक्षणांची व्याख्या करताना हेच अभिप्रेत होते व ते कालातीतही आहे. 
 
भारताची सांस्कृतिक उज्ज्वल परंपरा पाहताना आपल्याकडे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉ. राधाकृष्णन यांनी केलेल्या कार्याला आपण देशभर असा दिवस साजरा करून अभिवादन करतो. डॉ. राधाकृष्णन हे बनारस विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते उपराष्ट्रपती होते, ते राष्ट्रपतीही झाले होते. राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी, राजदूत, भारतीय तत्त्वज्ञानाचे उपासक, थोर तत्ववेत्ते होते व ते शिक्षकही होते. 1948 च्या स्वतंत्र भारताच्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रासाठीचे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या विविध क्षेत्रातील योगदानामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, शिक्षकांनी यातून प्रेरणा घेऊन समाजप्रती आपली जबाबदारी ओळखून चोख कर्तव्य करावे हीच भूमिका यामागे आहे.
 
शिक्षकांनी, शिक्षक हा पेशा न मानता ते व्रत समजावे व घेतला वसा टाकू नये, ऊतू नये, मातू तर अजिबात नये. कालौघात शिक्षणक्षेत्रातील आवाहने व शिक्षकांविषयीच्या संकल्पना बदलत आहेत. गुरू, गुरुजी, मास्तर, बाई, सर, ताई आणि आता मॅडम अशी बिरूदे शिक्षकांसाठी पुढे आली आहेत. शिक्षक व विद्यार्थी यातील अंतर कमी झाले आहे. शिक्षकांविषयीची आदरुक्त भीती आता अभावानेच आढळते. गुरुंविषयीचा अभिमान, आदर असणारी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वेही तशीच कमीच होत आहेत. शिक्षकांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. गुरुची कामं आता यंत्र करत आहे. शाळा, महाविद्यालय ही संकल्पना भविष्यात लयालाही जाईल. ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन पदवीही मिळेल. या सगळ्या गदारोळात माणसाच्या सामाजिकीकरण प्रक्रिया मात्र होणार नाही. सहवेदना, सहकार्य, सहानुभूती, त्याग, सोसणे या मानवी भावभावनांचे विकसीकरण कदाचित होणार नाही. सवंगडय़ा सोबत, एका विशिष्टवेळी, विशिष्ट इमारतीत प्रत्यक्ष प्रसंग घडत असताना, प्रत्यक्ष जीवनानुभवातून आपण जे अनुकरणाने, अवलोकनाने, अनुभवातून शिकतो त्याचे काय? हा प्रश्न बाकी असेल. यादृष्टीने विचार करता, मानवाने यंत्रे निर्माण केली. विकसित केली. हीच यंत्रे माणसाची जागा घेत आहेत. पण शिक्षण क्षेत्रात ई-लर्निगची साधने हा शिक्षकांसाठीचा पर्याय होऊ शकत नाही. संस्कार, प्रेम, शिस्त, सृजनांचे रूजवण करण्याचे काम यंत्रे करू शकत नाहीत. हेच खरे.
 
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पारंपरिक शिक्षण व आधुनिक शिक्षण असे दोन प्रवाह दिसतात. जीवन कौशलवर आधारित किमान कौशल्ये प्राप्त करून देणारे शिक्षण हे भविष्यात उपोगी पडणारे आहे. कुशल मनुष्यबळ हीच आपली आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती असणार आहे. अगदी आधुनिक पद्धतीच्या शेतीपासून ते अवकाश शास्त्रापर्यंतच तंत्रज्ञानाचा शिक्षणात अंतर्भाव करून राष्ट्राला घडवणारी, राष्ट्राला स्वतंत्र वेगळी ओळख प्राप्त करून देणारी पिढी निर्माण करण्याचे मोठे आव्हान मात्र आपलपुढे आहे. शिक्षणाने प्रगती होते, समाज विकसित होतो, देश प्रगत होतो हे खरे; पण आपण मिळवलेले ज्ञान, कौशल्ये हे आपल्या ‘स्व’ सुखापुरते मर्यादित न ठेवता. समाजाभिमुख व्हावे आपण कार्य करतो. समाजासाठी लढतो, उभे राहतो, समाजाला योगदानाच्या रूपात काही देऊ शकतो तेव्हाच हे शक्य आहे व हीच मानसिकता विद्यार्थमध्ये निर्माण करण्याचे अवघड काम मात्र शिक्षकांना करायचे आहे. धर्म, प्रांत, जात, देश या मर्यादा ओलांडून गेल्याशिवाय ग्लोबलाझेशनच्या खर्‍या अर्थापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. म्हणून सर्व थरातील शिक्षणाला व शिक्षकांना आज महत्त्व आहे. माझ्यामधले ‘दि बेस्ट’ देण्याची तळमळ असणारे शिक्षकच हाडाचे शिक्षक ठरतात. समाजभिमुखी पिढी घडवताना विद्यार्थ्यांमध्ये ग्रासलेल्या प्लसची जाणीव, सामर्थ्याची ओळख करून देण्याचे काम होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला अभिप्रेत असलेला शिक्षणातून सर्वागिण विकास घडणार आहे. ‘शिक्षक दिन’ म्हणूनच सगळ्यांसाठी चिंतनाचा दिन ठरावा. मी देशासाठी काय करू शकतो. देशाला काय देऊ शकतो, माझ्या जन्माची सार्थकता कशात आहे, ते इप्सित साध्य करण्याच्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून आपण कार्यरत असावे. आज काळ बदलला आहे. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. शिक्षणतज्ज्ञांइतकेच या शिक्षण प्रक्रियेत पालकांनाही महत्त्व आले आहे. समाजाची गरज, विद्यार्थी घडवणे, पालकांची अपेक्षा, आपल्या व्यवसायाची पवित्रता जपणे, प्रतिमा जपणे या सगळ्याचा मेळ घालताना आपले ज्ञानही अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. या सगळ्याचा बॅलन्स करत ह्या व्रताची अवघड वाटचाल करावायची आहे. शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा!