सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 मार्च 2023 (23:42 IST)

April Fool's Day : त्या आठ बातम्या ज्या लोकांना खोट्याच वाटल्या

april fool day jokes
आजकाल खऱ्या बातम्या आणि फेक न्यूजमध्ये फरक करणारी रेघ अस्पष्ट होत चालली आहे. त्यामुळे कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही हे वाचकांना कळणं अवघड आहे.
पण गेल्या काही वर्षांत काही अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत ज्या खऱ्या होत्या पण ज्यांना वाचून लोकांनी मात्र प्रतिक्रिया दिल्या, 'येडा झाला काय!'
1. अब्जाधीश एलॉन मस्क यांनी रॅप गायलं
स्पेस एक्स आणि इलेक्ट्रिक कार टेस्ला सारख्या कंपन्यांचे मालक असणाऱ्या एलॉन मस्क यांनी 'RIP हराम्बी' असं रॅप गाणं प्रसिद्ध केलं आहे.
हराम्बी अमेरिकेच्या सिनसिनाटीमधल्या एका प्राणीसंग्रहालयातलं गोरिला अस्वलं होतं. ज्याला 2016 मध्ये गोळी घातली गेली होती. त्याच्या मृत्यूनंतर 'हराम्बी तुला शांतता लाभो' अशा आशयाचं गाण मस्क यांनी गायलं होतं.
2. युक्रेनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कॉमेडियन आघाडीवर
युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसणारा कॉमेडियन आघाडीवर आहे. एक्झिट पोलमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
व्होलोड्यमर झेलनस्कीय या कॉमेडियनने टीव्हीवरील एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षाची भूमिका निभावली होती. या कलाकाराला 30.4 टक्के मतं मिळाल्याचं एक्झिट पोलमध्ये उघड झालं आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 17.8 टक्के मतं आहेत.
3. इलेक्ट्रॉनिक म्युझिक ऐकलं तर डास चावत नाहीत
जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक म्युझिक ऐकत असाल तर तुम्हाला डास चावणार नाहीत, विशेषतः तुम्ही जर स्क्रीलेक्स या अमेरिकन गायकाचं संगीत ऐकत असाल तर असं नक्कीच शक्य आहे.
एका नव्या अभ्यासानुसार ध्वनी लहरी अनेक प्राण्यांच्या प्रजननात आणि लोकसंख्येच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
4. 'नायजेरियन लोक लंडनहून पिझ्झा मागवतात'
नायजेरियाचे कृषी मंत्री अदु ओगबेह यांनी दावा केला की "नायजेरियन लोक आपला मोबाईल वापरून ब्रिटिश एअरवेजव्दारे लंडनहून पिझ्झा मागवत आहेत."
त्यांनी एका रॅलीमध्ये म्हटलं होतं की लोक मोठ्या प्रमाणावर इतर देशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहायला लागले आहेत.
5. माशांच्या त्वचेतून बनणार अँटिबायोटिक
फिश स्लाईम म्हणजेच माशांच्या त्वचेतून एका नव्या प्रकारचं अँटिबायोटिक बनू शकतं. अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्निया भागात आढळणाऱ्या माशांच्या 17 नव्या जाती सापडल्या आहेत.
ओरोगॉन युनिर्व्हिसिटीच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की या माशांच्या त्वचेवर असणाऱ्या एका चिकट स्रावापासून अँटिबायोटिक होऊ शकतं.
6. टोकियाच्या एका हॉटेलमध्ये तीन किलोचा बर्गर बनवला
15 सेमी लांब, 25 सेमी रूंद असा तीन किलोचा बर्गर टोकियोच्या ग्रॅण्ड हयात या हॉटेलने बनवला. या बर्गरचा त्यांनी त्यांच्या मेनूमध्येही समावेश केला आहे. याचं नाव आहे गोल्डन जॉईंट बर्गर आणि यांची किंमत आहे 1 लाख येन (जपानी चलन) म्हणजेच 62 हजार रूपये.
7. रॅपर स्नूपडॉग आपली पैशांनी भरलेली बॅग नाईटक्लबमध्ये विसरला
प्रसिद्ध रॅपर स्नूपडॉग आपली पैशांनी भरलेली बॅग इंग्लंडच्या एक्सेटर शहरातल्या एका नाईटक्लबमध्ये विसरला होता.
या बॅगेत चार लाख पाऊंड म्हणजेच जवळपास तीन कोटी रूपये होते. या क्लबच्या मालकाने सांगितलं की सन 2014 मध्ये स्नूपडॉगने इंग्लंडचा दौरा केला होता.
8. अमेरिकेच्या नौसेनेत आता माशांची भरती
अमेरिकेच्या सैन्याने शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सागरी प्राण्याची भरती केली आहे. खरंतर ही भरती एका वैज्ञानिक प्रयोगाचा भाग आहे. ज्याच्या अंतर्गत सागरी जीवांच्या पारंपारिक संवाद आणि गोष्टी लक्षात ठेवण्याच्या संकेतांचा वापर सागरातल्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.