गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 जून 2022 (11:41 IST)

दामिनी अॅप : वीज कुठे पडणार ते 15 मिनिटे आधी कळणार, कसं ते जाणून घ्या...

damni app
श्रीकांत बंगाळे
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी परिसराला काल (9 जून) जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. या वादळी वाऱ्याच्या पावसात अवसरी येथील शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाच्या बाजूला वीज कोसळली.
 
सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून वसतीगृहाच्या पाठीमागील बाजूस ही वीज कोसळल्याने मोठा अनर्थ टळलाय.
 
दरम्यान, खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय.
 
जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात.
 
भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं दामिनी अॅप तयार केले आहे.
 
तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या अॅपच्या माध्यमातून समजते.
 
पण, हे दामिनी अॅप नेमकं काय आहे? ते कुठे उपलब्ध आहे आणि ते वापरायचं कसं? याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
 
'वीज पडल्यामुळे दरवर्षी 2 हजार जणांचा मृत्यू'
जगभरात दरवर्षी 28 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय वीज सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
गेल्या वर्षी या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना इंडियन मेटरॉजिकल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. ए. के. सहाय यांनी वीज पडण्याच्या संकटाचं गांभीर्य सांगताना म्हटलं की, "भारतात अलीकडच्या वर्षांत वीज पडून मृत्यू आणि नुकसान होण्याचं प्रमाण वाढत आहे.
 
"वादळ आणि वीज पडणं ही भारतातील सर्वांत मोठी धोकादायक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामुळे दरवर्षी 2000 हून अधिक मृत्यू होतात."
 
दामिनी अॅप काय आहे?
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेनं 2020 मध्ये 'दामिनी लाईटनिंग' अप विकसित केलं आहे.
 
संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो , त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो.
 
हे अॅप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे अॅप देतं.
 
तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असात तर काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना या अॅपमध्ये दिल्या आहेत.
 
आता हे अॅप कसं वापरायचं ते जाणून घेऊया.
 
दामिनी अॅप कसं वापरायचं?
दामिनी अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर 'Damini : Lightning Alert' असं सर्च करायचं आहे.
 
हे अॅप डाऊनलोड केलं की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठी परवानगी द्यायची आहे.
 
त्यानंतर हे अॅप तुमचं लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. आणि मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल.
 
वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथं दिलेली असेल.
 
पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते आणि निळा रंग असेल, तर 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.
 
खबरदारीच्या सूचना
या अॅपवरील Instructions या पर्यायात तुम्ही जर वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची, याच्या सूचना दिल्या आहेत.
 
या अॅपवरील Register या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथं नोंदणी करू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, पिनकोड, व्यवसाय ही माहिती भरून तुम्ही या अॅपवर नोंदणी करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या भागात वीज पडण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते.
 
जून-जुलैचा महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी दामिनी अॅप वापरण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला केलं आहे.
 
यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासदंर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात वीजा चमकत असल्यास काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना दिल्या आहेत.