शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2023 (20:58 IST)

ऑनलाईन जुगाराचं व्यसन कसं लागतं, त्यावर बंदी शक्य आहे का?

online gaming
गणेश पोळ
'आधी आमचा मुलगा घरातील एक रुपया खर्च करायचा असेल तरीही आम्हाला विचारायचा. पण गेल्या सहा महिन्यात त्याला मित्रामुळे वेगळाच नाद लागला. आता तो पगाराचे पैसे पण घरी देत नाही. उलट स्वत:च्या आणि बापाच्या नावावर दीड लाख कर्ज काढलं. तेही त्याने उडवले. शेवटी आम्ही त्याला पोलिसांकडे नेलं आणि त्यांच्याकडून त्याची समजूत घातली'
 
पुण्याच्या आराधना (नाव बदलेलं आहे) पोटतिडकीनं सांगत होत्या. कारण कॉलेज करत पार्टटाईम जॉब करणाऱ्या त्यांच्या मुलाला ऑनलाईन जुगाराचं व्यसन लागलं आहे.
 
राज्यातील आणि देशभरातील तरुणांमध्ये ऑनलाईन जुगार हा साथीसारखा पसरत आहे.
 
मोठे सिनेस्टार आणि क्रिकेटर या ॲप्सना प्रमोट करताना तुम्ही पाहिलं असेल. IPL टीमच्या जर्सीवरही त्याचं प्रमोशन होतंय.
 
त्यामुळे ऑनलाईन जुगाराची लोकप्रियता वाढत आहे.
 
‘घरी बसून लाखो रुपये कमवा, करोडो रुपये कमवा,’ अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. पण तज्ज्ञांच्या मते या जाहिरातींचा छुपा उद्देश उलट आहे. तो म्हणजे ग्राहकांचे लाखो रुपये लुटणे आणि तुम्हाला ऑनलाईन जुगाराचं व्यसन लावणे.
 
ऑनलाईन जुगार हा चिंतेचा विषय बनत आहे. जगभरात हा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. कारण याचं तात्काळ व्यसन लागू शकतं आणि या जुगाराचे अनेक प्रकार आहेत. सोबतच गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा मोठा प्रसार झाला आहे. मोबाईल फोन तुलनेने स्वस्त झाले आहेत.
 
ऑनलाईन जुगारातून बक्कळ पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले जाते. सुरुवातीला यातून पैसेही मिळतात.
 
पण कालांतराने जुगारात मोठी रक्कम खर्च होते आणि हाती काहीच लागत नाही.
 
पैसे पुन्हा मिळतील या आशेने अनेक तरुण-तरुणी ऑनलाईन जुगार खेळतात. यात बहुतेकजण हरतात. त्यामुळे आर्थिक अडचणी येऊन अनेकांची घरे उद्धस्त होतात.
 
काही केसेसमध्ये पीडितांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
 
हा ऑनलाईन जुगार काय असतो? त्याचं व्यसन कसं लागतं? त्यावर कायद्याने पूर्ण बंदी का घातली जात नाही? हे आपण जाणून घेऊ.
 
ऑनलाईन जुगाराचं व्यसन कसं लागतं?
इंटरनेटवरून किंवा मोबाईल ॲप्सद्वारे पैशांची पैज लावली जाते त्याला ऑनलाईन जुगार म्हटलं जातं.
 
यात पोकर, ब्लॅकजॅक, स्लो मशीन्स आणि खेळावर लावलेला सट्टा यांचा समावेश होतो.
 
या ऑनलाईन जुगारात समोर मानवी व्यक्ती असते किंवा कंप्युटर प्रोग्रॅमही असू शकतो.
 
नवख्या व्यक्तींना हा जुगार सुरुवातीला मोफत खेळायची संधी दिली जाते. सोशल मीडियावरून त्यांना टार्गेट केलं जातं. जुगाराचे ॲप्स असे डिझाईन केले जातात जिथे तुम्ही तासनतास खिळून बसता. हे ॲप्स एक क्षणही विचलित होऊ देत नाही.
 
तुमचे फ्री क्रेडिट संपल्यावर तुम्ही पुन्हा स्वत:च्या पैशाने खेळता. पहिल्यांदा जुगार खेळल्यानंतर संबंधित वेबसाईट तुम्हाला पुन्हा तुमच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी जाहिरातींचा भडिमार करतात.
 
डिजिटल तंत्रज्ञान अभ्यासकांच्या मते पारंपारिक जुगाराशिवाय ऑनलाईन जुगाराकडे नवीन पिढी झपाट्याने आकर्षित होतेय. कारण हे कुटुंबियांपासून लपवून करता येतं. त्यासाठी तुम्हाला घर सोडायची गरज नाही.
 
ती व्यक्ती नातेवाईक किंवा मित्रांच्या डोळ्यात येत नाही. सगळं ऑनलाईन असल्याने तुम्हाला नोटांची देवाण-घेवाण करायची गरज नसते.
 
ऑनलाईन जुगाराचा आयुष्यावर विपरित परिणाम
 
अनेक लोक सुरुवातीला फावल्या वेळात गंमत म्हणून जुगार खेळतात. पण त्याची चटक लागते. काही लोकांच्या बाबतीत हे विखारी ठरू शकतं. त्यात त्यांनी स्वत:चं आयुष्य पण संपवलं आहे.
 
दुसरीकडे गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा मोठा प्रसार झाला आहे. मोबाईल फोन तुलनेने स्वस्त झाले आहेत. ऑनलाईन जुगाराचं व्यसन इतरांपासून सहजपणे लपवून ठेवता येतं. ही समस्या असल्याचं पीडित व्यक्ती सतत नाकारते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
 
जुगाराचा तुमच्या आयुष्यावर निगेटिव्ह परिणाम होतो. वैयक्तिक संबंध खराब होतात. कौटुंबिक आयुष्य राहात नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतो.
 
अशात ती व्यक्ती हरलेले पैसे आपण पुन्हा जिंकू या त्वेशाने अधिक जुगार खेळू लागते. त्यातून आपण आपल्यावरचं कर्ज फेडू असा भ्रम राहतो.
 
"व्यसन वाढल्यानंतर जुगार खेळल्याशिवाय तुम्हाला ताण, तणाव किंवा नैराश्यापासून मोकळीक मिळत नाही. तुम्ही सतत जुगाराची पुढची संधी शोधत राहता. व्यसन लागल्यावर या लोकांना दिवस रात्र यातला फरक कळत नाही. ते कायम जुगाराचाच विचार करतात," असं तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य सांगतात.
 
काहींना जुगारामुळे मानसिक तणावापासून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. त्यामुळे टाईमपास होतो आणि कंटाळा येत नाही, असंही त्या सांगतात.
 
महाराष्ट्रासह देशभरात सध्या ऑनलाईन रमीच्या जाहिरातींचा भडिमार सुरू आहे. सोशल मीडियावर तर सिनेस्टार, क्रीडापटूच याच्या जाहिराती करतात. यावर टीकाही होत आहे.
 
पण आता या ऑनलाईन रमीबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्त्यांच्या या ऑनलाईन खेळापोटी तामिळनाडूमध्ये 42 जणांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
ऑनलाईन जुगाराचा वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत असं आवाहन केलं आहे.
 
ऑनलाईन जुगाराविरोधात कायदा काय सांगतो?
राज्यात महाराष्ट्र लॉटरी नियंत्रण कायदा, महाराष्ट्र (मुंबई) गेम प्रतिबंध कायदा 1887, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 असे कायदे आहेत. पण हे पारंपारिक जुगारांना आळा घालण्यासाठी आहेत.
 
पेजर, इंटरनेट, वायफाय, मोबाईल, लॅपटॉपपासून अनेक दुरसंचार साधनांचा उदय झाला. सहाजिकच पारंपारीक आकडे लावून चालणारा जुगार ऑनलाईन सुरु झाला.
 
मोबाईल ॲप्लिकेशन किंवा लिंक द्वारे चालणाऱ्या जुगार गेम (खेळ) या नावाने खेळविला जात असल्याने जुगार या संज्ञेत ऑनलाईन जुगार येत नाही. अशा स्थितीत जुगारावर नियंत्रण ठेवण्याला पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवर मर्यादा येतात. त्यामुळे हे रोखण्यासाठी पारंपारीक जुगार आणि मोक्का कायद्यात सुधारणा करावी अशी शिफारस नाशिकचे तत्कालिन पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी केली होती.
 
ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायद्यात काय बदल करायला पाहिजेत याविषयी पांडे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीकडे सविस्तर मसुदा पाठवला होता.
 
त्यामध्ये त्यांनी 18 सुधारणा सुचवल्या होत्या. महाराष्ट्र लॉटरी ऑनलाईन जुगार नियंत्रण करण्यासाठी राज्यात सरकारी अधिकारी नेमावेत. महाराष्ट्र गॅमलिंग प्रतिबंध कायदा 1987 मध्ये सुधारणा करून मोबाईल ॲप्लिकेशन किंवा लिंकद्वारे जुगार चालवणाऱ्यावर नियंत्रण आणावे, असं पांडे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
 
ऑनलाइन जुगाराच्या समूळ उच्चाटनासाठी या कायद्याची नव्याने आखणी करावी लागणार आहे. यात आरोपींविरोधात मोक्का वा स्थानबद्धतेसारखी कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी, असंही त्यांनी म्हटलं होतं.