मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (17:50 IST)

मनामध्येही इंधन भरलं का ..?

आज नेहमीच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबलो होतो. पेट्रोलपंप अगदी टापटीप आहे, थंडपाण्याची पाणपोई सुध्दा आहे. असो. इथले वैशिष्ट्य म्हणजे येथे दिवसभर 'एफएम' रेडिओ चालू असतो. पंपावर येणाऱ्या ग्राहकांच्या कानावर घटकाभर जुन्या हिंदी गाण्यांच्या मधुर चाली पडत असतात.
 
आज एक गंमतच झाली आणि त्या प्रसंगातून मला मात्र एक मोलाची शिकवण मिळाली. एक तरुण रांगेत आमच्या पुढे उभा होता. त्याने बाईकमध्ये पेट्रोल भरलं. पेट्रोलटँकचं झाकण बंद करुन थोडं पुढे जाऊन नुसता उभा राहिला. पंपावरच्या कर्मचाऱ्याला वाटलं की काही सुटे पैसै तर द्यायचे नाहीयेत, तरी हा का बरं थांबलाय? त्याने खुणेने त्याला विचारले की काय हवंय? ..... आणि तो तरुण चक्कं थोडं लाजुन म्हणाला, 'काही नाही, 'एफएम' वर आवडीचं गाणं लागलंय ते ऐकतोय.!'
 
मित्रहो, हे उत्तर ऐकून त्या कर्मचाऱ्यासह पंपावर उपस्थित अनेकांच्या चेहऱ्यावर स्मीत उमटले. परंतु मी मात्र एकदम अंतर्मुख झालो. सहज मनात विचार डोकावला की खरंच, वाहनाप्रमाणेच मनालाही इंधनाची गरज असते की.! पोषक, सकारात्मक, आनंददायी, आल्हाददायी आदी प्रकारचे इंधन पुरवल्यावर मनुष्याचं ह्रुदयरुपी इंजिनदेखील का बरं चांगल्या तऱ्हेने परफॉर्म नाही करणार.? मन का बरं प्रसन्न तथा तंदुरुस्त नाही रहाणार? का नाही ते आनंदविश्वात छानपैकी रपेट मारुन येणार.? थोडक्यात असे इंधन मनामध्ये भरुन घेण्याची मुळात आपली इच्छा असली पाहिजे. त्यासाठी थोडी सवड काढली पाहिजे. आपले छंद, आवडीनिवडी, आपल्याला प्रेमजिव्हाळा लावणारी माणसे, मित्रपरिवार, निसर्ग, ठराविक ठिकाणे आदी गोष्टी मनामध्ये याप्रकारचे इंधन भरुन देणारे पेट्रोलपंप असावेत. चला तर मग, मनाच्या इंधनाची टाकीपण सदा फुल्ल करुन घेत जाऊयात. आयुष्य हे आनंदयात्रा म्हणून घडवायचं आहे ना.?