सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (21:09 IST)

फेअर अॅंड लव्हली: फेअरनेस क्रीमवर अभिनेत्री उषा जाधव म्हणते, मनाचं सौंदर्य, हेच खरं सौंदर्य

भारतात फेअरनेस क्रीमची बाजारपेठ ज्यांनी तयार केली त्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने गुरुवारी एक मोठा निर्णय जाहीर केला. कंपनीचा सर्वांत मोठा ब्रँड असणाऱ्या 'फेअर अँड लव्हली' या क्रीमच्या नावातून 'फेअर' हा शब्द आता काढण्यात येणार आहे.
 
1975 साली फेअर अँड लव्हली भारतीय बाजारात आली आणि उदारीकरणानंतर फेअरनेस क्रीम बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनीही शिरकाव केला. इथे त्यांना मोठं मार्केट मिळालं.
 
पण गेल्या काही वर्षात गोरेपणा म्हणजेच सौंदर्य असं म्हणणं हा रंगभेद आहे, असा आवाज दृढ होऊ लागला. सौंदर्याचा गोरेपणाशी संबंध नाही आणि ते प्रत्येकाने जाणलं पाहिजे, यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच हा महत्त्वाचा निर्णय आला आहे.
 
याच विषयावर, अनेक उत्तम चित्रपटात सुरेख भूमिका बजावणारी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली अभिनेत्री उषा जाधव हिच्याशी बीबीसी मराठीने गप्पा मारल्या. उषा सांगते, "खरं सौंदर्य मनाचं असतं. मन सुंदर असेल तर ते सौंदर्य चेहऱ्यावरही झळकतं."
 
पाहा संपूर्ण मुलाखत -
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने 'फेअर अँड लव्हली' या क्रीमच्या नावातून फेअर शब्द काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल तुला काय वाटतं?
 
माझ्या डोक्यात पहिला विचार आला की 'फेअर अँड लव्हली'ने घेतलेला निर्णय खूपच 'फेअर' आहे. माझ्या आठवणी आहेत लहानपणीच्या, तेव्हा परवडतही नव्हतं. तरीही माझ्या बहिणी बाबांकडे हट्ट करून फेअर अँड लव्हली आणायच्या... वापरायच्या. काटकसरीने वापरायच्या. कारण काय तर गोरं व्हायचं आहे. त्यामुळे गेली वर्षानुवर्ष सुरू असलेल्या भेदभावाकडे बघता हा निर्णय खूप स्वागतार्ह आहे, असं मला वाटतं.
 
हा निर्णय सेलिब्रेट करण्याचं कारण नाही, पण तो अधोरेखित केला गेला पाहिजे.
 
गोरेपणाचं आकर्षण आपल्या संस्कृतीत, परंपरेतच आहे. पण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमुळे त्या आकर्षणाचं ऑब्सेसशन झालं आहे का? गोरेपणा म्हणजेच सौंदर्य हे खोलवर रुजवण्यात या इंडस्ट्रीचा हातभार आहे, असं वाटतं का?
 
हे आपल्या समाजातच आहे. लहानपणापासूनच आपण बघत आलोय, मी म्हणेन अनुभवत आलो आहोत की मुलगी जन्माला आली आणि ती सावळी असेल तर आईवडिलांची काळजी तिथूनच सुरू होते. तिच्या लग्नाचं काय होईल, याची काळजी तेव्हापासूनच सुरू होते.
 
विवाहसंस्था किंवा मॅट्रिमोनिअल साईट्सवरसुद्धा तुमचा रंग कोणता, असा एक कॉलम असतो. तुमचा वर्ण कसा आहे, गव्हाळ आहे की गोरा आहे, हे भरावं लागतं. मग फिल्म इंडस्ट्री यातून कशी सुटेल? कारण शेवटी हा समाजाचाच भाग आहे. जोवर समाजात बदल होत नाही सिनेमातही बदल दिसत नाही. सिनेमातला मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सावळ्या रंगामुळे बरेच रिजेक्शन मिळालं, 'अरे हमें तो खूबसूरत लड़की चाहिए', असं म्हटलं जायचं.
 
मग खूबसूरतीची काय व्याख्या आहे तर गोरेपण. तुम्हाला अभिनय येत असो किंवा नसो. तुम्ही नाकी-डोळी दिसायला कसे आहात, हे बघितलं जात नव्हतं. 'हमे गोरे लोग चाहिए', असं ते होतं. त्यामुळे हे आहेच इंडस्ट्रीत. पण मी हेसुद्धा सांगेन की आता इंडस्ट्रीत नवीन दिग्दर्शक आलेत, येत आहेत ज्यांचा या सगळ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे गोष्टी बदलत आहेत. हळूहळू ती प्रक्रिया सुरू आहे. पण अजूनही सुंदर असणं म्हणजे गोरं असणं, ही संकल्पना अजूनही आहे.
 
म्हणजे इंडस्ट्रीत गोरेपणावर कामं मिळतात?
 
गोऱ्या रंगाचा किती हव्यास आहे, याचं उदाहरण म्हणजे सिनेमांमध्ये किती परदेशी हिरॉइन्स दिसतात बघा. त्या मुख्य भूमिकेत दिसतात, यशस्वी आहेत, तथाकथित स्टार्स आहेत. पण त्यांना कोणत्या निकषावर काम देण्यात आलं? त्यांना आपली भाषा येते का? सुरुवातीला यायची का? नाही. त्या गोऱ्या आहेत, म्हणजे ब्युटीफुल आहेत. मग लगेच कामं मिळाली, मग लगेच शोज मिळाले. मग लगेच ते स्टार झालेत, म्हणजे आपण किती ऑबसेस्ड आहोत.
 
मला आणखी एक सांगायचं आहे की हल्ली असंही दिसतंय की मालिकांमध्ये गोऱ्या लोकांना कास्ट करून त्यांना सावळा मेकअप करून मग त्यांच्याकडून सावळ्या मुलीची भूमिका करवून घेतात. कशासाठी? हिंदीमध्ये हे आहे, मराठीत आहे. ही अशी उदाहरणं आपल्याच आजूबाजूला आहेत. मग तीच लोकं येणार आणि म्हणणार की 'ब्लॅक इज ब्युटीफुल' आणि 'Black Lives Matter'.
 
या इंडस्ट्रीमधल्या सेलिब्रेटिजनी फेअरनेस क्रिमच्या जाहिराती केल्या. मात्र याच इंडस्ट्रीत अशा कितीतरी सेलेब्रिटिस आहेत, ज्यांनी अशा जाहिराती नाकारल्या. रंगभेदाविरोधात आवाज उठवला. तू स्वतः याविषयावर वेळोवेळी बोललेली आहेस. त्यामुळे गोरेपणाच्या आग्रहाला खतपाणी घालणारी ही इंडस्ट्री असली तरी हा दुराग्रह दूर करून जागरुकता निर्माण करण्याचीही ताकद या इंडस्ट्रीत आहे का आणि त्यादिशेने जास्तीत जास्त पावलं उचलली गेली पाहिजे का?
 
नक्कीच. ही ताकद फिल्म इंडस्ट्रीत आहे आणि बदल होईल. हळूहळू होतोय. जे नवीन लोकं या इंडस्ट्रीत येत आहेत ते गोरेपणा म्हणजेच सौंदर्य या संकल्पनेवर विश्वास ठेवू इच्छित नाहीत. अनेक तरुण अॅक्ट्रेसेसने आम्ही अशा जाहिराती करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. नवीन दिग्दर्शकांना रंगाचा फरक पडत नाही. नंदिता दास यांनी तर 'ब्लॅक इज ब्युटीफुल' म्हणून मोहीमही उघडली. त्यामुळे इंडस्ट्रीत माणसं आहेत जी याला विरोध करतात, बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात.
 
तरुण मुलींमध्ये, मुलीच काय मुलांमध्येसुद्धा गोऱ्या रंगाचं किती आकर्षण आहे, हे फेअरनेस क्रिमच्या विक्रीवरूनच लक्षात येतं. आम्हाला विचारायचं आहे की तू जेव्हा कॉलेजमध्ये होतीस, लहान होतीस. त्या काळात तू कशी होती. तुला कधी या रंगाचं आकर्षण वाटलं का? गोरं व्हायचा तूही प्रयत्न केला होतास का?
 
नाही. मला कधीच ही अडचण आली नाही. मला हा न्यूनगंडही आला नाही. मी नेहमीच कॉन्फिडंट होते आणि मला तरुणांना हेच सांगायचं आहे की स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच स्वतःला म्हणा की 'I am beautiful'. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा ते आपल्या व्यक्तिमत्त्वातूनही दिसतं.
 
बरेचदा असं होतं की अनेकींना आपल्या रंगाचा न्यूनगंड असतो. त्यांचा आत्मविश्वास खाली जातो. त्यांना वाटतं, मी सावळी आहे. मला काम मिळणार नाही. समाजात स्थान मिळणार नाही. माझ्याशी कुणी मैत्री करणार नाही. माझं लग्न चांगल्या घरात होणार नाही. या सर्वांमुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता.
 
पण मी सांगेन अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्तृत्त्वावर विश्वास ठेवा. स्वतःचं व्यक्तिमत्त्व विकसित करा. स्वतःचं ज्ञान वाढवा. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. बाह्य सौंदर्यावर अवलंबून राहू नका.
 
शेवटी सौंदर्य हे सबजेक्टिव्ह आहे. कुणाला कुणी सुंदर वाटेल, कुणाला नाही वाटणार. पण कुणी मला काही म्हटलं तर त्याला महत्त्व देऊन मी माझा आत्मविश्वास का घालवू. मी तुला माझ्या आयुष्यात एवढी पॉवर देणार नाही.
 
तुझ्या लेखी सौंदर्य म्हणजे काय? तुझी सौंदर्याची व्याख्या काय?
एखादी व्यक्ती हसत असेल, निरागस मनाची असेल, मोकळ्या मनाची असेल तर ते माझ्यासाठी सौंदर्य आहे. मग ती व्यक्ती गोरी आहे की नाही, तिचं नाक सरळ आहे का, डोळे टपोरे आहेत का, हे महत्त्वाचं नाही. जी व्यक्ती मनाने चांगली ती सुंदर आहे.