शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:27 IST)

घड्याळ ......

जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले. घड्याळ्यात तास काटा, मिनीट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनीट काटा म्हणजे आई, व सेकंद काटा मुल असल्याचे जाणवले. या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही. 
 
परिवारात वडील म्हणजे तास काटा,याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. पण ते घरातल्या कोणालाच लक्षात नसते. ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते. वडिलांचे म्हत्तव लक्षात येत नाही. 

आई म्हणजे मिनीट काटा असते. प्रत्येक मिनीटाला (अगदी सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो, व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते. आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.
 
जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटूंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्या शिवाय घराला पुर्णत्व येत नाही.
 
पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पुर्ण झाले तरी या साठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे. एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा)चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ ऊडेल.
 
- सोशल मीडिया