सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (21:02 IST)

एमपीएससीमार्फत आठशे पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची आठशे पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार असून, या पदाची १९९४ नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे.
 
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यभरातील ३७ केंद्रांवर ८ ऑक्टोबरला पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तर मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. सहायक कक्ष अधिकारी गट ब या संवर्गातील ४२, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील ७९, पोलीस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील ६०३ आणि दुय्यम निबंधक संवर्गातील ७८ पदांची भरती केली जाणार आहे.
 
उमेदवारांना या परीक्षेसाठी २५ जून ते १५ जुलै या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यंदा या परीक्षेच्या पदांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२०मध्ये ८०७, २०२१मध्ये १ हजार ८५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर २०२२ साठी आठशे पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होऊ शकतो. तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.