मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

तरुणीची खास पसंती वूडन ज्वेलरी

घरातल्या फर्निचरसाठी होणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु लाकडाचा वापर आता चक्क दागिन्यांसाठीही होऊ लागलाय. या लाकडी दागिन्यांना तरुण मुलींचीही चांगली पसंती मिळतेय. लाकडांपासून बनवलेल्या बांगड्या, कानातले, नेकलेस या गोष्टींचा यात समावेश आहे. उन्हाळ्यात घामामुळे फारसे दागिने किंवा अ‍ॅक्सेसरीज घालायला नको वाटतं. अशा वेळेस वूडन ज्वेलरीचा पर्याय चांगला आहे. मोठे, चपटे, गोल, त्रिकोणी आकारातील नेकपीस, बांगड्या, रंगीबेरंगी- लांबलचक माळा, ब्रेसलेट, इयररिंग्ज कोणत्याही शेड्‍सवर शोभून दिसतात. विविध रंगांच्या लाकडी बांगड्या हातभर घालणारी एखादी बाला भलताच भाव खाऊन जाते. हे दागिने साधे पण युनिक वाटतात. कॉलेजपासून, समारंभातून, ऑफिसपर्यंत कुठेही शोभतात. लाकडाचे हे दागिने मॅट तसेच ग्लॉस प्रकारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही परवडण्यासारखी असल्यामुळे दुधात साखरच! दागिन्यांशिवाय लाकडी बेल्ट्सनाही तरुणींची पसंती मिळत आहे. स्कर्ट- फ्रॉक आणि जीन्सवरही हे बेल्ट    वेगळा लूक देतात.
 
वजनाला हलके, कुठल्याही अ‍ॅलर्जीची भीती नाही यामुळे या दागिन्यांना खास पसंती आहे. विशेषतः पारंपरिक कपड्यांवर हे दागिने शोभून दिसतात. निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्यासह वेगवेगळ्या रंगांच्या मिक्स कॉम्बिनेशन्समध्येही उपलब्ध आहेत. अ‍ॅक्सेसरिजचा हा वेगळा प्रकार वापरताना चप्पल, बॅग आणि कपड्याच्या रंगाचा अंदाज घेऊन त्याला साजेशा रंगाच्या ज्वेलरीची निवड करता येईल. 
बांगड्या - लाकडी दागिन्यांवर वेगवेगळ्या रंगांचं पॉलिश करण्यात येतं. विशेषतः यातल्या रंगीबेरंगी बांगड्या प्रथमदर्शनी काचेच्या असल्यासारख्या भासतात. लाकडी बांगड्यांचा हा पर्याय मस्त आणि ट्रेंडी आहे. पारंपरिक भारतीय नक्षीकाम आणि मण्यांची सजावट केलेल्या बांगड्यांचा सेट कुठल्याही कपड्यांवर उठून दिसतो. चौकोनी, षट्कोनी, अष्टकोनी अशा निरनिराळ्या आकार आणि डिझाइन्समधल्या बांगड्या कुठल्याही रंगाची साडी, कुर्ता किंवा अगदी ऑफिसवेअर कपड्यांवरही तितक्याच शोभून दिसतात. त्यामुळेच कॉलेज तरुणींबरोबरच इतर वयोगटातल्या ‌स्त्रियाही त्यांचा वापर करताना दिसतात. या लाकडी बांगड्या २५ ते १५० रुपयांपर्यंत मिळतात. त्यावरचं डिझाईन आणि नक्षीकाम यावर त्यांची किंमत अवलंबून असते.  ब्रेसलेट आणि नेकलेस- लाकडाचा वापर करून बनवलेले ब्रेसलेट्सही बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात. यासोबतच लाकडी नेकलेस घालण्याचा ट्रेंडही कॉलेज तरुणींमध्ये दिसून येतोय. प्रामुख्याने हे नेक पीस कुर्ता किंवा साडीला आणखीन क्लासिक लूक देतात. यामध्ये विशेषतः एकरंगी लाकडी मणी तसेच लांबट चौकोनी किंवा लांबट गोलाकार, त्रिकोणी चकत्यांचा वापर केला जातो.

हे नेकलेस शक्यतो ब्राऊन किंवा काळसर रंगात असल्याने ते कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर शोभून दिसतात. तसेच टीशर्टवर लाकडी नेकलेसऐवजी चेनमध्ये एखाद्या रंगीत पेंडन्टचा वापर करू शकता. लाकडी नेकलेस ७५ रुपयांपासून ५०० पर्यंत मिळतात तर ब्रेसलेट्स त्या तुलनेत थोडेसे महाग असतात