सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

Anant Chaturdashi 2022 Katha अनंत चतुर्दशी व्रत कथा

Anant Chaturdashi 2022 vrat katha
या व्रताचा उल्लेख हा पुराणातही आढळतो. जेव्हा पांडव जुगारात आपलं सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हटले की, जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचं व्रत केलं तर त्यांच्यावरील सारी संकटे दूर होतील आणि गेलेलं राज्यही परत मिळेल.
श्रीकृष्णाने या व्रताचं महत्त्व सांगण्याबाबत एक कथा सांगितली जी या प्रमाणे आहे –
प्राचीन काळी सुमंत नामक एक तपस्वी ब्राम्हण होता. ज्याच्या बायकोचं नाव दीक्षा होतं. दोघांची एक अत्यंत सुंदर धर्मपरायण तसेच ज्योतिर्मयी कन्या होती. जिचं नाव सुशीला होतं. सुशीला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षाचं निधन झालं. पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशीलाचा विवाह सुमंतने कौंडिण्य ऋषींसोबत लावून दिला. पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही वीटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले. कौंडिण्य आपल्या बायकोसोबत त्यांच्या आश्रमाकडे निघाले. 
 
रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी किनारी संध्यापूजा करू लागले. यादरम्यान सुशीलाने पाहिलं की, खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत. सुशीलाने त्या महिलांना विचारले की, त्या कोणाची प्रार्थना करत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी त्यांचं व्रत करण्याचं फार महत्त्व असतं. व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशीलाने या व्रताचं अनुष्ठान केलं आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली. कौंडिण्य यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारलं असता तिने सर्व सांगितलं. पण ऋषींनी हे मानण्यास साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला. यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले. या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशीला हिला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब सांगितली. पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं.
 
जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमीनीवर कोसळले. तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले की, हे कौंडिण्य, तू माझा तिरस्कार केलास त्यामुळे तुला हे कष्ट भोगावे लागले. तू दुःखी झालास. पण आता तुला पश्चाताप झाला आहे. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर. 14 वर्षांपर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल. तुला धन-धान्ययुक्त संपत्ती प्राप्त होईल. कौंडिण्य यांनी तसंच केलं आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळाली.
 
श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिराने अनंत देवाचं 14 वर्ष विधीवत व्रत केलं आणि त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि चिरकाल त्यांनी राज्य केलं. यानंतर अनंत चतुर्दशीचं व्रत प्रचलनात आलं.