रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (14:47 IST)

गजलक्ष्मी व्रत कथा

भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील म्हणजे पितृपक्ष पंधरवड्यातील अष्टमी तिथी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. लक्ष्मी व्रतांतील महत्त्वाचे व्रत म्हणजे गजलक्ष्मी व्रत. या व्रतात लक्ष्मी देवीची गजलक्ष्मी रुपात पूजा केली जाते. समुद्रमंथनावेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली होती. यावेळी ऐरावताने लक्ष्मी देवीवर जलाभिषेक केला, तेव्हापासून तिला गजलक्ष्मी संबोधले गेले. या दिवशी हत्तीवर स्वार देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी देवी महालक्ष्मी अमाप संपत्ती आणि आनंदी जीवनाचे विशेष वरदान देते. या दिवशी कालष्टमी आणि महालक्ष्मी व्रत पूर्ण होते. व्रत करणार्‍याला व्रताचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पूजा करून गज लक्ष्मी व्रत कथा ऐकतात आणि गज लक्ष्मी व्रत कथा या प्रकारे आहे- 
 
एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो श्रीविष्णू भक्त होता आणि नियमित प्रभूंची पूजा-आराधना करत होता. त्याच्या भक्तीने आणि उपासनेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला दर्शन दिले आणि ब्राह्मणाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा लक्ष्मी देवीचा वास आपल्या घरी असावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. यावर श्रीविष्णूंनी त्याला एक उपाय सांगितला. विष्णूंनी सांगितले की, गावातील मंदिरासमोर एक महिला येते, ती आल्यावर तिला तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण दे. ती देवी लक्ष्मी आहे.
 
विष्णू ब्राह्मणाला म्हणाले, जेव्हा संपत्तीची देवी आई लक्ष्मी तुझ्या घरी भेट देईल तेव्हा तुझं घर पैसे आणि धान्यांनी भरेल. असे म्हणत श्रीविष्णू अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण मंदिरात गेला. तेथे एक स्त्री आली. तेव्हा ब्राह्मणाने त्या स्त्रीला घरी येण्याची विनंती केली. लक्ष्मी स्वरुप स्त्रीला ब्राह्मणाचे शब्द ऐकून समजले की हे सर्व विष्णूच्या सांगण्यावरून घडले आहे.
 
लक्ष्मी देवी ब्राह्मणाला म्हणाल्या की, आपणाकडे यायला मी तयार आहे. मात्र, त्यापूर्वी महालक्ष्मीचे व्रत आचरावे. संपूर्ण १६ दिवस हे व्रत करावे. १६ व्या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होईल. लक्ष्मी देवीच्या सांगण्यावरून ब्राह्मणाने अगदी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण वृत्तीने व्रताचरण केले. लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. या व्रताचे महात्म्य असून, लक्ष्मी देवीचे व्रत याच कालावधीत करण्याची परंपरा पुढे सुरू झाली, असे सांगितले जाते.