कोकणाप्रमाणेच भारताच्या पश्चिम किना-यावर दक्षिणेला केरळात राहणारे लोक या काळात ओणम हा त्यांचा सर्वाधिक महत्वाचा सण साजरा करतात. त्या भागातले लोक सौर पंचांगानुसार चालतात. सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्यांच्या महिन्यांची नावे ठेवलेली आहेत. श्रावण किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला सूर्याचे भ्रमण सिंह राशीमधून होत असल्यामुळे या महिन्याचे नाव चिंगम (सिंहम किंवा सिंघम चा अपभ्रंश) असे आहे. वामनावतारात श्रीविष्णूने ज्या बळीराजाला पाताळात घालवून दिले त्याचे राज्य सध्याच्या केरळ प्रदेशात होते अशी समजूत असल्यामुळे बळीराजा हा त्यांचा महानायक आहे. वामनाची आज्ञा शिरोधार्य मानल्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूभगवानांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले आणि दरवर्षी ओणमच्या दिवसात पृथ्वीतलावर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. हा सण दहा दिवस चालत असल्यामुळे बरेच वेळा तो नारळी पौर्णिमेच्या काळात चाललेला असतो. केरळीय लोक या दिवसात पूजाअर्चा वगैरे करतातच, शिवाय खास रांगोळ्या, खाणेपिणे वगैरे होते, तसेच नौकानयनाच्या स्पर्धा होतात. या बोटरेसेस पहायला आता जगभरातून पर्यटक येऊ लागले आहेत.